विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:19 AM2021-06-19T04:19:21+5:302021-06-19T04:19:21+5:30
चंद्रपूर : कोरोनाच्या काळात टाळेबंदीमुळे अनेक पालक वर्गांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. ...
चंद्रपूर : कोरोनाच्या काळात टाळेबंदीमुळे अनेक पालक वर्गांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. तसेच सर्व ऑफलाइन परीक्षा रद्द करून ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. परंतु, याही परिस्थितीत मोठ्या प्रमाणात परीक्षा शुल्क आकारण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करावे, अशी मागणी मनविसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या मार्गदर्शनात मनविसे तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने कुलसचिवांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
महाविद्यालयाकडून ऑनलाइन वर्ग सुरू असतानाही शिक्षण शुल्क, वाचनालय, प्रयोगशाळा, इंटरनेट, व्यायामशाळा, वार्षिक कार्यक्रमाच्या नावे विद्यालये बंद असतानाही अवाजवी शुल्क आकारण्यात येत आहे. सर्व विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत असताना इतर सुविधांच्या नावे पैसे कशाला, असा सवाल मनविसेने निवेदनातून केला आहे. सुप्रीम कोर्टाने संस्थांना शुल्क आकारताना सवलत देण्याचे निर्देश देऊनही अनेक संस्था विद्यार्थ्यांना कोणताही दिलासा देत असल्याचे दिसत नाही. त्यासाठी विद्यालयाच्या शुल्कमध्ये सवलत देण्यासाठी विद्यापीठामार्फत सर्व संस्थांना आदेश देण्यात यावे, तसेच ज्या विद्यार्थ्यांचे मागील शुल्क भरले नाही अशा विद्यार्थ्यांना परीक्षेपासून व शिक्षणापासून वंचित ठेऊ नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. कोअर कमिटीच्या बैठकीत विषय ठेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासंबंधी चर्चा करून सकारत्मक निर्णय घेण्याचे आश्वासन कुलसचिव अनिल चिताडे यांनी दिले, यावेळी नागाळा गट ग्रामपंचायत सदस्य नितीन टेकाम, मनसे शिक्षक सेनेचे कैलास खुजे आदी उपस्थित होते.