बोजा चढवून देण्यास तलाठ्याचा नकार
By admin | Published: April 9, 2015 01:16 AM2015-04-09T01:16:13+5:302015-04-09T01:16:13+5:30
बँकेची कुठलीही हरकत नसताना केवळ तलाठ्याच्या आडकाठी धोरणामुळे बाम्हणी येथील एका शेतकऱ्याला विवाह कर्जापासून वंचित राहण्याची पाळी आली होती.
नागभीड : बँकेची कुठलीही हरकत नसताना केवळ तलाठ्याच्या आडकाठी धोरणामुळे बाम्हणी येथील एका शेतकऱ्याला विवाह कर्जापासून वंचित राहण्याची पाळी आली होती. पण येथील काही युवकांनी तहसिलदार श्रीराम मुंदडा यांच्याकडे तक्रार करताच तलाठी सरळ झाला.
ज्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे लग्न आहे, अशा शेतकऱ्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला २५ हजाराचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. बाम्हणी येथील भाऊराव भुळे या शेतकऱ्याने या योजनेसाठी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे अर्ज केला. बँकेने तो मंजुरीही केला अािण तलाठ्यांकडून जमीनीवर बोजा चढवून आणा, अशी भुळे यांना सूचना दिल्या.
बँकेच्या सूचनेनुसार भुळे तलाठ्याकडे गेले. पण तलाठी भुळे यांना दाद देईना. अपाल्या पातळीवर भुळे यांनी विविध प्रयत्न केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी भुळे यांनी मोहाळीचे माजी सरपंच अमित देशमुख आणि युवा कार्यकर्ते समिर भोयर यांच्याकडे धाव घेतली. देशमुख आणि भोयर यांनी भुळे यांना सोबत घेवून तहसिलदार श्रीराम मुंदडा यांची भेट घेतली व त्यांना झालेला प्रकार सांगितला. तहसिलदार मुंदडा यांनी या प्रकाराबद्दल तलाठ्याला विचारणा केली व सदर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवून देण्याच्या सुचना केल्या. (तालुका प्रतिनिधी)