शिक्षकांची बदली झाल्याने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दिला शाळेत जायला नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 02:54 PM2018-08-28T14:54:39+5:302018-08-28T14:56:04+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात असलेल्या बारसागड येथे मंगळवारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची बदली झाल्याच्या कारणाखातर शाळेत जायला नकार दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जिल्ह्यातील सावली तालुक्यात असलेल्या बारसागड येथे मंगळवारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची बदली झाल्याच्या कारणाखातर शाळेत जायला नकार दिला. सावली पंचायत समितीच्या गेवरा बूज केंद्रात बारसागड येथे प्राथमिक शाळा आहे. तेथे पहिली ते चौथीचे वर्ग असून विद्यार्थी संख्या १३ एवढी आहे. या विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे. मात्र गेल्या चार वर्षांपासून येथील एका शिक्षकाला कायम प्रतिनियुक्तीवरच रहावे लागते. परिणामी एकाच शिक्षकाला सर्व वर्ग घ्यावे लागतात. अशात येथील शिक्षिका कु. व्ही.के. सपाटे यांची बीईओ वैभव खांडरे यांनी दुसरीकडे बदली केल्याचे कळताच विद्यार्थी व पालकांत संताप उसळला. या घटनेचा निषेध म्हणून विद्यार्थ्यांनी शाळेतच जायचे नाही असा निर्धार करून शाळेकडे पाठ फिरवली. जोपर्यंत आमचे हक्काचे शिक्षक शाळेत येत नाहीत तोपर्यंत शाळेत एकही विद्यार्थी येणार नसल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर मोरांडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.