कोचिंग क्लासेसच्या अग्नी सुरक्षा यंत्रणेबाबत मनपा गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:32 PM2019-06-14T23:32:12+5:302019-06-14T23:33:54+5:30
शिक्षणासाठी कोचिंग क्लासेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चंद्रपूर शहरात असलेल्या विविध कोचिंग क्लासेस चालकांनी फायर सुरक्षा यंत्रणा बसविणे अत्यंत गरजेचे आहे. या दृष्टीने येत्या १९ जूनला कोचिंग सेंटर चालक व त्या इमारतीचे मालमत्ताधारक यांची संयुक्त बैठक महानगरपालिकेत बोलविण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शिक्षणासाठी कोचिंग क्लासेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चंद्रपूर शहरात असलेल्या विविध कोचिंग क्लासेस चालकांनी फायर सुरक्षा यंत्रणा बसविणे अत्यंत गरजेचे आहे. या दृष्टीने येत्या १९ जूनला कोचिंग सेंटर चालक व त्या इमारतीचे मालमत्ताधारक यांची संयुक्त बैठक महानगरपालिकेत बोलविण्यात येणार आहे. सर्व कोचिंग सेंटर्सला यासंदर्भात सूचित केले जाणार असून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व निकषांचे पालन करण्यात येईल, यासाठी महानगरपालिका पाठपुरावा करणार असल्याची व प्रसंगी कठोर पाऊले उचलण्यात येणार असल्याची माहिती महापौर अंजली घोटेकर यांनी १४ जून रोजी मनपात झालेल्या बैठकीत दिली.
यापूर्वी मनपातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय इमारती, दवाखाने, शाळा तसेच अनेक इमारतींना नोटीस देण्यात आल्या आहेत. शहरात अनेक कोचिंग सेंटर सुरु असून यातील काही इमारतीच्या पहिल्या माळ्यावर, काही दुसºया तर काही तिसºया माळ्यावर सुरु आहेत. अनेकदा इतर सर्व बाजूंनी बंद असलेल्या या क्लासेसमधे जाण्या-येण्यासाठी एकच दरवाजा किंवा मार्ग असतो.
आपातकालीन परिस्थितीत बाहेर निघण्याच्या दृष्टीने प्रत्येक कोचिंग क्लासेसला एक पर्यायी मार्ग असणे आवश्यक आहे.
कोचिंग क्लासेस चालविणारे व ज्या इमारतीत ते चालविले जातात, त्या घरमालकांची एक संयुक्त बैठक १९ जून रोजी महापौर अंजली घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात येणार आहे.
यात नोटीस दिल्यानंतर कोचिंग क्लासेसद्वारा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायर यंत्रणा बसविण्यासंदर्भात काय कारवाई करण्यात आली, याचा आढावा घेतला जाणार असून त्यांनी फायर सुरक्षा यंत्रणा लवकरात लवकर बसवावी, याकरिता आवश्यक ती उपाययोजना केली जाणार आहे. मनपा येथे आयोजित बैठकीला उपायुक्त गजानन बोकडे, अग्निशमन विभाग प्रमुख सचिन माकोडे, अंकुश धोपटे आणि मनपा अधिकारी उपस्थित होते.
८० क्लासेसला बजावली होती नोटीस
२७ मे ते ६ जून या कालावधीत फायर सुरक्षा यंत्रणा नसलेल्या ८० कोचिंग क्लासेसला चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यात झोन क्रमांक १ अंतर्गत ५०, झोन क्रमांक २ अंतर्गत २४ व झोन क्रमांक ३ अंतर्गत ६ अशा शहरातील ८० कोचिंग क्लासेसचा समावेश आहे. यापैकी केवळ १४ क्लासेसमधे अग्निरोधक यंत्र आहेत. त्यांची तपासणी केली असता अधिकांश यंत्रणा कार्यरत नसल्याचे आढळून आले होते. अग्निशमनच्या दृष्टीने लागणाºया यंत्रणेत निकषानुसार अग्निरोधक यंत्र, हाऊस रील, आॅटोमॅटिक स्प्रिंक्लर सिस्टम तसेच टेरेस टँक असणे गरजेचे आहे.