पीकपेरा नोंदणी ऑफलाइन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:33 AM2021-09-04T04:33:50+5:302021-09-04T04:33:50+5:30

चंद्रपूर : राज्य शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी व पीक नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया शेतकऱ्यांना स्वतःच्या ॲण्ड्राॅइड मोबाइलने पार ...

Register Pickpera offline | पीकपेरा नोंदणी ऑफलाइन करा

पीकपेरा नोंदणी ऑफलाइन करा

googlenewsNext

चंद्रपूर : राज्य शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी व पीक नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया शेतकऱ्यांना स्वतःच्या ॲण्ड्राॅइड मोबाइलने पार पाडायची आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे ॲण्ड्राॅइड मोबाइल नाही. मोबाइल असणाऱ्यांना माहिती नोंदविता येत नाही. एवढेच नाही, तर अनेक परिसरात नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे ही प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात यावी, अशी मागणी पिपरीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पारस पिंपळकर यांनी केली आहे.

राज्य शासनाने पीक पाहणी व पीक पेरा नोंदणी सुरू केली आहे. १५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत ही ऑनलाइन मोहीम राबविली जाणार आहे. या प्रक्रियेदरम्यान शेतीमालकाचे नाव, शेतीत घेतले जात असलेले पीक, मशागत करणाऱ्याचे नाव, गट क्रमांक, गावाचे नाव यासह अन्य माहिती नोंदवायची आहे. कर्ज प्रकरण व अन्य सुविधांबाबत ही माहिती राज्य शासन विचारात घेणार आहे. मात्र, शासनाने ही प्रक्रिया सुरू करताना अनेक बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया तांत्रिक बाबीत अडली आहे. आजघडीला ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे ॲण्ड्राॅइड मोबाइल नाही. ज्या शेतकऱ्यांकडे मोबाइल आहे त्यांना माहिती नोंदविताना अनेक अडचणी येत आहेत. तसेच अनेक परिसरात नेटवर्कचीही समस्या आहे. त्यामुळेच ऑगस्ट महिना लोटूनही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही. ऑनलाइन नोंदणी न करणारे शेतकरी भविष्यात अनेक योजनांपासून वंचित राहू शकतात.

शासकीय योजनांपासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी राज्य शासनाने ही प्रक्रिया ऑफलाइन राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पिंपळकर यांनी केली आहे. चंद्रपूरचे तहसीलदार नीलेश गौंड यांना निवेदन देताना कमलाकर निब्रड, विठ्ठल भोयर, महेंद्र बेरड, संदीप पिंपळकर, संजय तुराणकर, अतुल मोहितकर, विठ्ठल पिंपळकर, हरिओम पोटवले, सुरेश चौधरी, संतोष मत्ते, विनोद देवतळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Register Pickpera offline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.