नागभीड लसीकरण केंद्रावर चंद्रपूरकरांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:29 AM2021-05-09T04:29:20+5:302021-05-09T04:29:20+5:30
नागभीड : नागभीड येथील लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणा चंद्रपूर येथील नागरिकांनी नोंदणी केली. मात्र प्रत्यक्ष लसीकरणासाठी ते आले ...
नागभीड : नागभीड येथील लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणा चंद्रपूर येथील नागरिकांनी नोंदणी केली. मात्र प्रत्यक्ष लसीकरणासाठी ते आले नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीचे डोज शिल्लक राहिले. दुसरीकडे ज्यांच्यासाठी हे केंद्र उभारले, त्या नागभीडकरांनाच लसीपासून वंचित रहावे लागले.
जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी जिल्ह्यातील फक्त सहा ठिकाणीच परवानगी दिली होती. त्यात नागभीड येथील जनता कन्या विद्यालय येथेही लसीकरण केंद्र मंजूर झाल्याने नागभीड परिसरातील नागरिकांच्या आशा पल्लवित होऊन नोंदणीसाठी तात्काळ धावपळ केली व अवघ्या काही वेळातच आगामी सात दिवसांची नोंदणी फुल्ल झाल्याचे लक्षात आले.
नागभीडच्या केंद्रावर दररोज २०० याप्रमाणे एकूण एक हजार ४०० डोस उपलब्ध झाले. २ मे पासून सुरू झालेल्या या केंद्रावर पहिल्या दिवशी फक्त १३७, दुसऱ्यादिवशी ११०, तर तिसऱ्या दिवशी १३५ जणांनी लस घेतल्याची माहिती मिळाली. याबाबत जि. प. सदस्य संजय गजपुरे यांनी अधिक माहिती घेतली असता, रिक्त राहिलेल्या डोसची नोंदणी करणारे हे चंद्रपूर शहरातील होते. काही अपवाद वगळता नोंदणी करणाऱ्या चंद्रपूर येथील नागरिकांनी १०० किमी दूर अंतरावर असलेल्या नागभीड केंद्रावर जाणे टाळले व यामुळेच या केंद्रावर १०० टक्के लसीकरण होऊ न शकल्याचे धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली.
बॉक्स
असा आततायीपणा बरा नव्हे
नागभीडला यायचेच नव्हते, तर नोंदणी करून परिसरातील नागरिकांना वंचित कशाला ठेवले, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.
वास्तविक नागभीडसारख्या ग्रामीण केंद्रावर लसीकरण करण्यासाठी हे केंद्र मंजूर केले असताना, चंद्रपूरकरांच्या आततायीपणामुळे परिसरातील १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना नोंदणी करता न आल्याने वंचित रहावे लागले आहे. असा आततायीपणा बरा नव्हे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे १ हजार ४०० पैकी जवळपास ४०० हून अधिक डोस बाकी राहिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या वयोगटातील विशेषत: युवक ॲानलाईन नोंदणीसाठी पुढे सरसावले असताना ही माहिती समोर आल्याने परिसरात रोष व्यक्त केल्या जात आहे.