अंगणवाडी मदतनीसाची नियमबाह्य नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2017 12:36 AM2017-02-05T00:36:10+5:302017-02-05T00:36:10+5:30
एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात शहरातील अंगणवाडी मदतनिस या पदावर कार्यरत एका महिला कर्मचाऱ्यास गेल्या दीड वर्षापासून चपराशी या पदावर...
बालविकास प्रकल्प कार्यालय
भद्रावती : एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात शहरातील अंगणवाडी मदतनिस या पदावर कार्यरत एका महिला कर्मचाऱ्यास गेल्या दीड वर्षापासून चपराशी या पदावर नियमबाह्यरित्या राबवून घेतले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
शहरातील बंगाली कॅम्प परिसरातील अंगणवाडी मदतनीसपदावर कार्यरत शोभा सोनटक्के हिला तिच्या मनाविरूद्ध प्रकल्प अधिकारी बावणे यांनी कार्यालयात चपराशी म्हणून ठेवले आहे. तिला या कार्यालयाच्या झाडलोटीपासून पाणी व फायली देण्यापर्यंतचे काम घेण्यात येते. तर या कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी देवगडे अधिकाऱ्याच्या तोऱ्यात वावरत असतात. ते चपराशी काम करण्याकरिता कमीपणा मानत असल्याने महिलेच्या व्यतिरिक्त त्यांनी स्वत:चे पैसे देवून राहुल पेटकर या युवकास कार्यालयात कामावर ठेवले आहे. पेटकर हा तालुक्यातील अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांच्याकडून कार्यालयात आल्यानंतर कामाचे पैसे घेतात. त्यास अधिकाऱ्यांची मूक संमती आहे. (शहर प्रतिनिधी)
मदतनीस बंगाली कॅम्प आंगणवाडीत कार्यरत आहे. कार्यालयातील कामकाज करण्याकरिता कर्मचाऱ्याची कमतरता असल्याने तिला गेल्या दीड वर्षापासून ठेवले आहे. आता मी तिला उद्यापासून त्या अंगणवाडीत कामास पाठवितो.
- बावणे, प्रभारी प्रकल्प अधिकारी
हा प्रकार दुर्दैवी असून एका महिलेस नियमाविरूद्ध त्याच्याकडून काम घेणे योग्य नाही. याकडे जर अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तिला पूर्वपदावर नियुक्त न केल्यास आंदोलन करण्यात येईल.
-वनिता घुमे, समाजसेविका