घाणीने माखलेल्या एसटी बसगाड्यांची आता नियमित स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:34 AM2018-02-18T00:34:03+5:302018-02-18T00:34:42+5:30
गाव तेथे एसटी, एसटीचा प्रवास-सुखकर प्रवास म्हणत ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ ब्रिद घेऊन जनतेच्या सेवेत असलेल्या एसटी महामंडळाला सध्या प्रवासी मिळानासे झाले आहेत.
परिमल डोहणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गाव तेथे एसटी, एसटीचा प्रवास-सुखकर प्रवास म्हणत ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ ब्रिद घेऊन जनतेच्या सेवेत असलेल्या एसटी महामंडळाला सध्या प्रवासी मिळानासे झाले आहेत. प्रवासी संख्या वाढावी, म्हणून विविध उपययोजनाही केल्या जात आहेत. मात्र भंगार बसगाड्या व बसमधील खर्ऱ्याच्या पिचकाऱ्या, अस्वच्छता यामुुळे अनेक प्रवाशी एसटीचा प्रवास टाळतात. त्यामुळे स्वच्छतेसाठी परिवहन महामंडळाने पुढाकार घेतला असून घाणीने माखलेल्या बसगाड्यांची नियमित स्वच्छता केली जात आहे.
राज्य महापरिवहन महामंडळातर्फे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातंर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी परिवहन महामंडळाने एका खासगी कंपनीला स्वच्छतेचे कंत्राट दिले असून या कंपनीच्या मार्फत महामंडळाच्या बसगाड्यांची व परिसराची नियमित स्वच्छता करण्यात येत आहे. महामंडाळाच्या बसगाड्या म्हणजे शासकीय मालमत्ता असा समज जनसामान्यात असल्याने कोणतीही पर्वा न करता अनेक प्रवासी बसगाडीत धुम्रपान करतात. खर्ऱ्याच्या पिचकाऱ्या मारतात. तर काही मुंगफल्ली व इतर खाद्यपदार्थाच्या पिशव्या सीटखालीच टाकून देतात.
या अस्वच्छतेमुळेच अनेकांना प्रवासामध्ये उलटी येत असते. त्यामुळे महामंडळाने बसची स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेतली आहे. चंद्रपूर आगारातील ९६ बसगाड्या व इतर आगारातून येणाऱ्या बसगाड्यांची नियमीत साफसफाई तसेच पाणी मारुन स्वच्छता केली जात आहे. यात चंद्रपूर आगारामध्ये येणाऱ्या दररोज १०० च्या जवळपास बसगाड्या स्वच्छ होत असून ४० बसगाड्या पाण्याने धुऊन काढण्यात येत आहेत. त्यामुळे महामंडाळाच्या बसगाड्यातील अस्वच्छता दूर होत आहे.
प्रवाशांच्या सहकार्याची गरज
परिवहन महामंडळाच्या उपक्रमातून बसची दररोज स्वच्छता केली जात आहे. मात्र त्यानंतरही काही प्रवासी बसमध्येच खर्रा खाऊन धुम्रपान करतात. त्यामुळे बसगाड्या पुन्हा खराब होताना दिसून येत आहेत. त्यासाठी प्रवाशांनी सहकार्य करण्याची गरज असल्याने एसटी महामंडळाच्या चालक-वाहकाचे म्हणणे आहे.