पुनर्वसित गावाची सिंचन योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:59 PM2017-12-18T23:59:12+5:302017-12-19T00:00:19+5:30

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मानव व वाघाचा संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा कोअर झोन क्षेत्रात वसलेल्या नवेगावचे सन २०१३ मध्ये खडसंगी जवळ पुनर्वसन करण्यात आले.

Rehabilitated Village Irrigation Scheme | पुनर्वसित गावाची सिंचन योजना रखडली

पुनर्वसित गावाची सिंचन योजना रखडली

Next
ठळक मुद्देआयडल पुनर्वसित नवेगाववासीयांची प्रतीक्षा : २ कोटी ६० लाखांची योजना थंडबस्त्यात

राजकुमार चुनारकर ।
आॅनलाईन लोकमत
चिमूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मानव व वाघाचा संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा कोअर झोन क्षेत्रात वसलेल्या नवेगावचे सन २०१३ मध्ये खडसंगी जवळ पुनर्वसन करण्यात आले. नागरिकांना प्राथमिक सुविधांसह शेतीसाठी सिंचन व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले गेले. येथे २ कोटी ६० लाख रुपयांची सिंचन योजना मंजुरही करण्यात आली. पण या योजनेचे काम रखडल्याने ही योजना अपूर्णच आहे. दीड वर्षांपासून काम बंद असल्याने येत्या हंगामात तरी शेतीला पाणी देणार काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगली प्राण्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. वाघाच्या शिकारीचे प्रमाणही वाढले. त्यामुळे मानव व वाघांचा संघर्ष टाळण्यासाठी शासनाने कोअर झोनमधील गावाचे पुनर्वसन केले. त्यामध्ये चिमूर तालुक्यातील नवेगाव व जामनी या दोन गावांचे पुनर्वसन सन २०१३ मध्ये करण्यात आले होते.
पुनर्वसित नवेगाव, जामणी या गावांना प्राथमिक सुविधांपासून शेतीला पाण्याची व्यवस्था करून देण्याची जबाबदारी शासनाची होती. शेती म्हणून जी जागा देण्यात आली त्या ठिकाणी संपूर्ण जंगल होते. त्यामुळे ही जमीन सपाट करताना शेतकºयांनी झाडे कापली. यामुळे या शेतीवर दोन वर्ष पीक घेता आले नाही. आता उत्पन्न घेण्याची वेळ आली तर सिचनांची सोय नाही. त्यामुळे नवेगाव येथील शेतकरी पुनर्वसन होवूनही संकटातच आहे.
नवेगाव येथील १११ शेतकऱ्यांसाठी शासनाने विदर्भ सिंचन विकास महामंडळ योजने अंतर्गत २ कोटी ६० लाख रूपयांची सिंचन योजना मंजूर करून काम सुरू केले. याकरिता मुरपार भूमिगत कोळसा खाणीतून येणारे वेस्टेज पाणी खोडदा नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाºयात अडवून शेतीला देण्यात येणार होते. खोडदा नाल्यावर बांध बांधून नवेगावपर्यत पाईपलाईन टाकण्यात आली आहे.
ही योजना पूर्ण करण्यासाठी तीन कंत्राटदारांना कंत्राट देण्यात आले होते. त्यात पाईपलाईन, बंधारा, पंप हाऊस, विहीर ही कामे करण्याचे कत्रांट हरिहरण कंपनीला देण्यात आले होते. यापैकी बऱ्याच प्रमाणात कामे पूर्ण झाली आहेत. मात्र कंत्राटदाराला पुढची देयके न दिल्याने काम बंद पडले आहे. तसेच थ्री फेज लाईन, मोटार पंप, वितरण पाईपलाईन आदी कामे करण्याचे कंत्राट एस. एम. हकीम कंपनीला तथा वितरण व्यवस्थेचे काम दुसºया कंपनीला देण्यात आले. या कंत्राटदारांनी पुढले बिल न मिळाल्याने एक वर्षभरापासून काम बंद ठेवले आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे आयडल पुनर्वसन ठरवलेल्या नवेगाव येथील शेतकºयांना पाण्याविना शेतीचे उत्पादन घेता येत नाही. वनविभागाचे तत्कालीन सचिव प्रवीण परदेशी यांनी नवेगाव पुनर्वसन हे देशातील आयडल पुर्नवसन गाव असल्याचे सांगून वन अधिकाऱ्यांचा गौरवही केला होता. मात्र चार वर्षांनंतरही येथील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.

पुनर्वसित नवेगाव येथील शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून विदर्भ सिंचन महामंडळाची योजना प्रस्तावित करून काम सुरू केले. या योजनेचे ८० ते ९० टक्के काम पूर्ण झाले. मात्र कंत्राटदारांना देयके न मिळाल्याने कॅनल, इलेक्ट्रीक फिटींग व टेस्टींगचे काम शिल्लक आहे. याकरिता मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. मात्र अजूनही निधी मिळाला. त्यामुळे ही योजना रखडली आहे.
- अजहर शेख, पं.स. सदस्य तथा अध्यक्ष पुनर्वसन समिती
नवेगाव (चिमूर).

Web Title: Rehabilitated Village Irrigation Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.