अतिरिक्त शिक्षकांना मिळणार दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 06:00 AM2019-11-14T06:00:00+5:302019-11-14T06:00:39+5:30
२८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार संचमान्यतेचे निकष बदलण्यात आले आहे. त्यानुसार वर्ग १ ते ५ शाळेत ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक, वर्ग ६ ते ८ शाळेत ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक व वर्ग ९ ते १० शाळेत ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे निकष लावण्यात आले आहे. हे निकष ग्रामीण, शहर आणि दुर्गम व डोंगराळ भागातही कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासनाने संच मान्यतेचे निकष बदलल्यामुळे मागील काही वर्षांत अतिरिक्त शिक्षकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अतिरिक्त ठरलेल्या या शिक्षकांच्या समायोजनांचे प्रश्न शिक्षण विभागापुढे बिकट ठरत आहे. त्यामुळे शालेय शिक्षक व क्रीडा विभागाने यावर्षी संचमान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे यावर्षी अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.
२८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार संचमान्यतेचे निकष बदलण्यात आले आहे. त्यानुसार वर्ग १ ते ५ शाळेत ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक, वर्ग ६ ते ८ शाळेत ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक व वर्ग ९ ते १० शाळेत ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे निकष लावण्यात आले आहे. हे निकष ग्रामीण, शहर आणि दुर्गम व डोंगराळ भागातही कायम आहे. गेल्या काही वर्षात इंग्रजी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटत आहे. विद्यार्थी संख्या कमी झाली की, अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढते आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे प्रमाण वाढले होते. विषयानुसार काही शिक्षक अतिरिक्त ठरत होते.
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचे प्रश्नही बिकट आहे. शासन अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना वेतन देत असले तरी त्यांच्याकडे शिकवणीचे काम नाही. ही अवस्था संपूर्ण राज्यातील आहे.
गेल्या काही वर्षांत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न बिकट असताना, संचमान्यतेनंतर पुन्हा अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढू नये म्हणून यावर्षी संचमान्यता रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
या संदर्भात शिक्षण संचालक माध्यमिक व प्राथमिक यांना पाठविलेल्या पत्रामध्ये स्पष्ट केले आहे की, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्णत: करणे शक्य होत नसल्यामुळे संस्थाचालकांना विद्यार्थी संख्येत वाढ करण्याकरिता संचमान्यता स्थगित करून एक संधी देण्यात येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.
संचमान्यतेचे निकष बदलल्याचे परिणाम
अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न हा शासनाने आॅगस्ट २०१५ मध्ये काढलेल शासन निर्णयामुळे भेडसावत आहे. संचमान्यता ठरविताना शहर, ग्रामीण, डोंगराळ भागातील असंतुलितपणा याकडे लक्ष वेधले नाही. पूर्वी संचमान्यता ठरविताना २० विद्यार्थ्यामध्ये एक शिक्षक असायचा.अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जुने निकष लागू होत नाही. तोपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचा लोंढा सुरू राहणार आहे.
समायोजनाचा गोंधळ कायम
ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढली आहे. त्या शाळेमध्ये निर्माण झालेली पदांची माहिती मिळणार नाही. संचमान्यता स्थगित केल्यामुळे त्या पदांना ब्रेक लागेल. रिक्त पदांची माहिती मिळू न शकल्यामुळे आधीच अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करणे अवघड जाईल. त्यामुळे संचमान्यतेचा गोंधळ कायम राहील, असे मत काही शिक्षकांनी व्यक्त केले आहे.
शासनाला दरवर्षी संचमान्यता करावी लागले. त्यानुसार कोणत्या ठिकाणी किती पदे बसतात. त्यानुसार समायोजन केल्या जाते. यावर्षी ही संचनामान्यता स्थगित केली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी हे शिक्षक अतिरिक्त झालेले आहे. त्यांचे समायोजन यावर्षी होणार नाही.
-विलास बोबडे,जिल्हाध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, चंद्रपूर