गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते ‘लोकमत समृद्ध वाटचाल’ पुरवणीचे विमोचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 11:43 PM2018-07-09T23:43:11+5:302018-07-09T23:43:37+5:30
तालुक्याची यशोगाथा, समस्या तसेच विकासात्मक वाटचाल नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकमततर्फे समृद्ध वाटचाल या विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले. या पुरवणीचा विमोचन सोहळा रविवारी स्थानिक गुंडावार सभागृहात पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : तालुक्याची यशोगाथा, समस्या तसेच विकासात्मक वाटचाल नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकमततर्फे समृद्ध वाटचाल या विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले. या पुरवणीचा विमोचन सोहळा रविवारी स्थानिक गुंडावार सभागृहात पार पडला.
‘लोकमत समृद्ध वाटचाल’ पुरवणीचे विमोचन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर आमदार बाळू धानोरकर, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, चंद्रपूर जिल्हा बँकेचे संचालक रविंद्र शिंदे, आर्णीचे माजी आमदार श्रीकांत मुनगीनवार, प्रतिभा धानोरकर, अल्का वाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकमततर्फे प्रकाशित केलेल्या समृद्ध वाटचाल या पुरवणीमुळे लोकमतच्या वाचकांना तालुक्यातील इतरही महत्त्वाची माहिती मिळेल. आबालवृध्दांसोबतच शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनाने विद्यार्थ्यासाठीही ही पुरवणी उपयुक्त व मार्गदर्शक आहे. त्यामुळेच ही पुरवणी फक्त वाचनीय नसून संग्रहणीय आहे अशा शब्दांत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ‘लोकमत’च्या समृद्ध वाटचाल पुरवणीचे कौतुक केले. कार्यक्रमाला तालुक्यातील अंदाजे दोन ते अडीच हजार नागरिकांची उपस्थिती होती.
यावेळी लोकमतचे भद्रावती तालुका प्रतिनिधी सचिन सरपटवार, शहर प्रतिनिधी विनायक येसेकर, घोडपेठचे वार्ताहर वतन लोणे, पिपरी (दे.)चे वार्ताहर रत्नाकर ठोंबरे, चोरा येथील वार्ताहर रत्नाकर डांगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लोकमतचे भद्रावती तालुका प्रतिनिधी सचिन सरपटवार यांनी केले.