फिल्मीस्टाईल पाठलाग करुन कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका, दोघांवर गुन्हा दाखल
By परिमल डोहणे | Published: July 12, 2024 10:28 PM2024-07-12T22:28:30+5:302024-07-12T22:28:44+5:30
या कारवाईत १३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ११ जुलै रोजी मध्यरात्री करण्यात आला.
चंद्रपूर : कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांच्या वाहनाचा पाठलाग करुन सावली पोलिसांनी खेडी फाट्यासमोर कारवाई करुन ३३ जनावरांची सुटका केली. या कारवाईत १३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ११ जुलै रोजी मध्यरात्री करण्यात आली.
जिल्हात अवैध धंद्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधिक्षक अधीक्षक रिना जनबंधू यांनी दिले होते. त्या अनुषंगाने ११ जुलै रोजी मध्यरात्री १ एक ट्रकमध्ये अवैध गोवंशीय जनावरे कृरतेने कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती सावली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी बस स्थानक सावली येथे नाकाबंदी केली. मात्र ट्रक भरधाव वेगाने मूलच्या दिशेने पळाला. पोलिसांच्या चमूने फिल्मी स्टाईल पाठलाग सुरु केला. दरम्यान ट्रकचालकांनी खेडी फाट्याजवळ ट्रक थांबवून पळ काढला.
पोलिसांनी एमएच ३४ बीजी ६३०७ वाहन जप्त करुन वाहनात कोंबून असलेल्या ३३ जनावरांची सुटका केली. ट्रक चालक व वाहकावर महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनीयम १९७६, प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनीयम १९६०, महाराष्ट्र पोलिस अधिनीयम १९५१ व मोटार वाहन अधिनीयम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार जिवन राजगुरू यांच्या नेतृत्वात विनोद निखाडे, विजय कोटनाके, कपील भंडारवार आदींच्या चमूने केली.