रिलायन्स जीओवर अंकुश
By admin | Published: July 17, 2014 11:58 PM2014-07-17T23:58:21+5:302014-07-17T23:58:21+5:30
रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. कंपनीला चंद्रपुरात भूमिगत केबल टाकणे व टॉवर्स उभारण्यासाठी मनपाने दिलेल्या परवानगीला मनपाच्याच नगरसेवकांनी कडाडून विरोध केला.
आयुक्तांनी काम थांबविले : सात बाबींवर मागितले स्पष्टीकरण
चंद्रपूर : रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. कंपनीला चंद्रपुरात भूमिगत केबल टाकणे व टॉवर्स उभारण्यासाठी मनपाने दिलेल्या परवानगीला मनपाच्याच नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. नागरिक व एनजीओंनीही याला समर्थन दिले. याची दखल घेत महानगरपालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर यांनी अखेर रिलायन्स जीओच्या बांधकामावर अंकूश लावला आहे. यासोबतच कंपनीकडून सात बाबींवर स्पष्टीकरणही मागितले आहे. त्यामुळे रिलायन्स जीओचा मुद्दा आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे.
रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. चे विदर्भ प्रमुख अनुराग वर्मा यांच्या नावाने आयुक्त सुधीर शंभरकर यांनी सदर आदेश जारी केले आहेत. या आदेशात कंपनीच्या कामाला दोन भागात विभाजित केले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर खोदकाम करून केबल टाकणे व शहरात टॉवर्स उभारणे, असे हे विभाजन आहे. सध्या महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची बांधकामे झालेली आहे. तब्बल तीन वर्षानंतर चंद्रपूरकरांना चांगले रस्ते मिळणे सुरू झाले आहे. रिलायन्स जीओच्या खोदकामामुळे हे रस्ते पुन्हा फुटणार आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे, असेही आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. याशिवाय शहरात शंभर टॉवर्स उभारल्यास टॉवरमुळे होणाऱ्या रेडीएशनचा अनिष्ट परिणाम सर्व जिवितांवर होण्याची भीती नागरिक व सामाजिक संघटना व्यक्त करीत आाहेत.
३० जून रोजी मनपाच्या आमसभेत या मुद्यावर साधक-बाधक चर्चाही झाली आहे. या पार्श्वभूमिवर आयुक्तांनी रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. कंपनीकडून सात बाबींवर स्पष्टीकरण मागितले आहे. आयुक्तांनी या आदेशाची प्रतिलिपी प्रधान सचिव, नगर विकास विभाग व जिल्हाधिकारी यांनाही पाठविल्या आहे. (शहर प्रतिनिधी)