आयुक्तांच्या आदेशाला रिलायन्स जीओचा खो
By admin | Published: July 19, 2014 12:55 AM2014-07-19T00:55:19+5:302014-07-19T00:55:19+5:30
रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. कंपनीद्वारे होणाऱ्या भूमिगत
काम करणारे अनभिज्ञ : आदेशानंतरही केबल टाकणे सुरूच
चंद्रपूर : रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. कंपनीद्वारे होणाऱ्या भूमिगत केबल टाकणे व टॉवर्स उभारण्याचा वाद आता चांगलाच चिघळत आहे. या कामाच्या विरोधात मनपाचेच नगरसेवक उभे ठाकले आहे. सामाजिक संघटनांनाही काही बाबींची पूर्तता हवी आहे. याशिवाय या कामाच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिकाही टाकण्यात आल्या आहेत. अशातच १४ जुलैला मनपाचे आयुक्त सुधीर शंभरकर यांनी रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीला काम तुर्तास थांबविण्याचे आदेश देऊन सात बाबींवर स्पष्टीकरण मागितले आहे. या आदेशाला ठेंगा दाखवित रिलायन्स जीओ आपले काम सुरूच ठेवले आहे.
रिलायन्स जीओच्या ४ जी केबल व टावर्स उभारणीच्या कामांबाबत मनपाच्या आमसभेत चर्चा झाल्यापासून वाद सुरू झाला आहे. सत्ताधारी नगरसेवकच मनपा पदाधिकाऱ्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. नागरिक व सामाजिक संघटनांनीही कंपनीने काही अटींची पूर्तता करावी, अशी भूमिका मनपानेच आयोजित केलेल्या चर्चेदरम्यान मांडली होती. या सर्व पार्श्वभूमिवर रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. चे विदर्भ प्रमुख अनुराग वर्मा यांच्या नावाने आयुक्त सुधीर शंभरकर यांनी १४ जुलैला एक आदेश जारी केला. सध्या महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची बांधकामे झालेली आहे. तब्बल तीन वर्षानंतर चंद्रपूरकरांना चांगले रस्ते मिळणे सुरू झाले आहे. रिलायन्स जीओच्या खोदकामामुळे हे रस्ते पुन्हा फुटणार आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे, असेही आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.
याशिवाय शहरात शंभर टॉवर्स उभारल्यास टॉवरमुळे होणाऱ्या रेडीएशनचा अनिष्ट परिणाम सर्व जिवितांवर होण्याची भीती नागरिक व सामाजिक संघटना व्यक्त करीत आाहेत. या पार्श्वभूमिवर आयुक्तांनी रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. कंपनीकडून सात बाबींवर स्पष्टीकरण मागितले आहे.
यात एचडीडीद्वारे केबल टाकल्यास जास्त रस्ते खोदण्याची आवश्यकता असणार नाही. त्यामुळे एचडीडीद्वारे केबल टाकणे जिथे शक्य आहे, त्याची निश्चित यादी सादर करावी. शहराचे क्षेत्रफळ ५६.२८ चौ.किमी आहे. यात शंभर टॉवर्स आवश्यक आहेत काय?, क्षेत्रफळानुसार कमीतकमी किती टॉवर तांत्रिकदृष्टया योग्य असतील ? प्रस्तावित टॉवर नेमके कुठे उभारायचे आहे, त्याचे स्थळदर्शक विवरण सादर करावे. ४ जी टॉवरच्या रेडीएशन संदर्भात जागतिक, केंद्रशासन, राज्यशासन या स्तरावर निश्चित केलेले जिवित प्राण्याला होणारे धोके, प्रभाव, परिणाम याबाबतचे निकष काय आहे. रिलायन्स कंपनीच्या ४ जी टॉवरची तांत्रिक स्थिती काय आहे. याशिवायनागरिकांच्या सुरक्षेसाठी रिलायन्स कंपनीची काय तरतूद आहे आदी बाबींचा समावेश आहे.
सध्या शहरात आर.आर.सी. कंपनीद्वारे शहरात केबल टाकण्याचे काम सुरू आहे. यात एचडीडीद्वारे खोदकाम केले जात आहे. आयुक्तांनी स्पष्टीकरण सादर करेपर्यंत काम तुर्तास थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर मार्गावर आज शुक्रवारीही केबल टाकण्याचे काम सुरूच होते.
तेथील कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी काम करण्याची परवानगी असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी लोकांनी कामाला विरोध केला होता. आता मात्र काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काम सुरू असल्याबाबत अनभिज्ञता दाखविली. उलट काम कुठे सुरू आहे, असा प्रश्न विचारत फोन कट केला. (शहर प्रतिनिधी)