पोंभुर्णा तालुका प्रभारीच्या भरवशावर
By Admin | Published: June 4, 2014 11:40 PM2014-06-04T23:40:34+5:302014-06-04T23:40:34+5:30
पोंभुर्णा तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, उपअधीक्षक भुमि अभिलेख अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी आदी महत्वाची पदे दोन वर्षांपासून रिक्त आहे. या पदांचा कारभार प्रभारांच्या
देवाडा (खुर्द) : पोंभुर्णा तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, उपअधीक्षक भुमि अभिलेख अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी आदी महत्वाची पदे दोन वर्षांपासून रिक्त आहे. या पदांचा कारभार प्रभारांच्या भरवश्यावर चालविला जात आहे. त्यामुळे अनेक कामे खोळंबली आहे.
तालुक्यातील ३२ ग्रामपंचायती व ७१ खेडेगावातील डोलारा या तालुक्यावर असुन तालुका निर्मीतीला आजतागायत १५ वर्षाचा कालावधी झाला. तालुक्याचा परिसर मात्र अविकसित आहे. त्यातच याठिकाणी महत्वाची पदे रिक्त असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक विकास कार्यानाही खीळ बसली आहे.
पोंभुर्णा कृषी कार्यालयामध्ये पुर्वी कार्यरत असलेले मंडळ अधिकारी शेले व गोंडपिपरीचे मुंधडा यांच्याकडे सदर पदाचा कारभार सोपविण्यात आला. परंतु मुंधडा यांची इतरत्र बदली झाल्याने मूल येथील पर्यवेक्षक गायकवाड यांच्याकडे प्रभारी कृषी अधिकारी म्हणून काम सोपविण्यात आले. परंतु दोन वर्षाचा कालावधी होवून सुद्धा याठिकाणी स्वतंत्र कृषी अधिकारी देण्यात आला नाही. या परिसरातील शेतकर्यांचा मुख्य व्यवसाय शेती असुन शेतकर्यांना आपल्या शेती विषयक समस्या घेऊन नेहमी या कार्यालयात कामासाठी जावे लागते. परंतु येथील कारभार प्रभारीच्या भरवश्यावर चालत असल्याने मूल येथील प्रभारी कृषी अधिकारी गायकवाड हे याठिकाणी फारसा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे येथील कार्यरत कर्मचार्यांवर त्यांचा वचक नाही. तालुक्यातील शेतकरी शेती विषयक कामासाठी कार्यालयात गेले असता. कार्यालयात शुकशुकाट असतो. त्याठिकाणी रिकामे टेबल व खुर्ची बघायला मिळते. अशी परिस्थिती गेल्या दोन वर्षांपासून या कार्यालयात बघायला मिळत असल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलल्या जात आहे. तर अनेक शेतकरी शासनाकडून कृषी विभागामार्फत मिळणार्या विविध योजनापासून वंचित आहेत. यावर्षीच्या अतिदृष्टीने परिसरातील शेतकर्याची प्रचंड नुकसान झाली. नदी, नाल्या काठावरील जमीन खरडून गेली.
शेतकरी हवालदिल झाला. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. परंतु सदर शेतकर्यांना कृषी विभागाकडून पाहिजे त्या प्रमाणात मदत मिळाली नाही. त्यामुळे पुढील उत्पादन घेणे त्यांना कठीण झाले आहे. येथील कृषी अधिकार्याचे पद रिक्त असल्याने विकास कामातही अडचणी येत आहेत. प्रभारी अधिकारी वेळ देऊ शकत नसल्याने याठिकाणी त्वरीत कृषी अधिकारी देण्यात यावा. तसेच या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून उपअधीक्षक भुमि अभिलेख अधिकारी हे पद सुद्धा प्रभारीच्या भरवश्यावर असल्याने ते याठिकाणी क्वचितच येत असतात. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांना आपल्या शेतजमिनी विषयक समस्यांना नेहमी अडचणीला तोंड द्यावे लागत असते. तालुक्याचे सदर पद सुद्धा शेतकर्यांना दृष्टीकोनातून फार महत्वाचे असल्याने याठिकाणी स्वतंत्र उपअधीक्षक भुमि अभिलेख अधिकारी त्वरित देण्यात यावे. परिसरातील शेतकर्यांना आपले काम करण्यास अडचण निर्माण होणार नाही. गेल्या आठ महिण्यापासून याठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकारी नसल्याने त्यांचा प्रभार येथील कार्यरत संवर्ग विकास अधिकारी अनिल चापडे यांच्याकडे असल्याने त्यांच्यावर पंचायत समिती समितीचाच संपूर्ण कार्यभाराचा ताण असल्याने ते पाहिजे त्या प्रमाणात वेळ देत नाही. एकंदरीत संबंधित विभागामध्ये स्वतंत्र अधिकारी नसल्याने या समस्या तालुक्यामध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे याचा विपरीत परिणाम तालुका विकासावर होत असुन तालुका अनेक समस्यांच्या विळख्याने सापडला आहे. संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधीनी या तालुक्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)