संततधार पावासामुळे वीज निर्मिती केंद्राला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 11:53 AM2018-07-07T11:53:30+5:302018-07-07T11:54:01+5:30
गुरुवारी आणि शुक्रवारी जिल्ह्यात संततधार पाऊस आल्याने चंद्रपूर वीज केंद्राला दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : इरई धरणातील सातत्याने खालावणाऱ्या पाण्याच्या पातळीने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मिती संकटात सापडली आहे. १५ जुलैपर्यंत पाण्याची पातळी वाढली नाही तर वरिष्ठांना अहवाल पाठवून निर्णय त्यांच्यावर सोपविण्यात येणार होता. मात्र गुरुवारी आणि शुक्रवारी जिल्ह्यात संततधार पाऊस आल्याने चंद्रपूर वीज केंद्राला दिलासा मिळाला आहे.
गतवर्षी २०१७ मधील पावसाळ्यात अत्यल्प पाऊस आल्याने इरई धरणात आवश्यक तेवढा पाण्याचा संचय होऊ शकला नाही. मात्र वर्ष २०१० मध्ये वीज केंद्राने धरणाच्या दरवाजांची उंची ५ मीटरने वाढवून २०७ वरून २०६.५ मीटर एवढी केली. म्हणजेच धरणात १८० द.ल.घ.मी. पाण्याचा साठा होईल, एवढी क्षमता वाढविण्यात आली. त्यामुळे वर्ष २०१६ मधील पावसाळ्यात धरणामध्ये वर्ष २०१० वर्षापूर्वीच्या तुलनेत अधिक प्रमाणात पाण्याचा संचय झाला. परिणामी धरणातून यंदा चंद्रपूर शहरासह वीज केंद्राला पाणी मिळाले.
उलट वर्ष २०१० मध्ये पाणी टंचाईमुळे उन्हाळ्यातच वीज केंद्र बंद करण्याची नामुष्की ओढावली होती. यंदा उन्हाळ्यातील संकट टळले होते. मात्र पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही पाऊस येत नसल्याचे बघून चंद्रपूर जिल्हा प्रशासन झोपेतून खडबडून जागे झाले. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी वीज केंद्रातील अभियंत्यांसोबत धरणाची पाहणी केली व १५ जुलैपर्यंत पाऊस न आल्यास वीज निर्मिती केंद्र बंद करायचे का, याबाबतचा अहवाल शासनाला व वरिष्ठांना पाठविण्याचा निर्णय घेतला.
या उन्हाळ्यात धरणाने २००.२७५ मीटर एवढी निम्न पाण्याची पातळी गाठली होती. अशातच गुरुवारी संततधार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारीही पाऊस सुरूच आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत धरणात ०.४०० मीटरने पाण्याची पातळी वाहून ती २००.७२५ मीटर एवढी झाली आहे. म्हणजेच धरणात ३.५७६ दलघमी पाण्याचा संचय झाला असून सद्यस्थितीला २१.५२९ दलघमी पाणी आहे. यामुळे आणखी काही दिवस वीज निर्मिती सुरू राहणार आहे.