सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पंचनामा करण्याचे शासनाचे आदेश

By राजेश भोजेकर | Published: October 10, 2023 04:04 PM2023-10-10T16:04:40+5:302023-10-10T16:05:32+5:30

सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Relief to Soybean Damaged Farmers; Government orders to do panchnama | सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पंचनामा करण्याचे शासनाचे आदेश

सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पंचनामा करण्याचे शासनाचे आदेश

चंद्रपूर: अस्मानी सुलतानी संकटात सापडलेल्या, आणि सतत अनिश्चिततेच्या छायेत असणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा सोयाबीन पिकावरील कीड आणि रोगाच्या प्रादुर्भावाने त्रस्त केले; या शेतकऱ्यांच्या मदतीला राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार धावून आले. मुनगंटीवार यांनी या नुकसानग्रस्त शेतकऱ्याची व्यथा प्रत्यक्ष शेतावर भेटू देवून जाणून घेतली: या बाबताची वस्तुस्थिती मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांना अवगत करून, विशेष पॅकेज जाहीर करण्याची विनंती केली. तसेच राज्याचे कृषिमंत्री व कृषीसचिवांना राज्यातील इतर जिल्ह्यातही अशाप्रकारे नुकसान झाले असल्यास त्या बाबत स्वतः लक्ष देवून आढावा घेण्याबाबत विनंती केली. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलीत म्हणून शासनाने आता राज्यातील सोयाबीनच्या नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारचे मदत व पुनर्वसन विभागाचे आदेश सोमवारी 9 ऑक्टोबर रोजी निर्गमित झाले आहेत.

या शासन निर्णयामुळे चंद्रपूरसह राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील सोयाबीन पिक वाढीच्या अवस्थेत असताना पडलेला पावसाचा खंड व अनियमित हवामान यामुळे जिल्हयात भात , सोयाबीन व कापूस या मुख्य पिकांवर किड व रोगाचा प्रादुर्भाव  आढळून आला होता. कृषि विभागामार्फत नियमीतपणे पिकांचे किड व रोगांचे सर्व्हेक्षण करण्यात येऊन वेळोवेळी शेतकऱ्यांना आवश्यक ते तांत्रीक मार्गदर्शन करुन किड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. सोयाबीन पिकावर किड व रोगाचा प्रादुर्भाव होवून पिक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर  राज्याचे वने,सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजुरा तालुक्यातील खामोना, पांढरपौनी, हरदोना (खु) येथे तातडीने जाऊन नुकसानग्रस्त क्षेत्राची  प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती दिल्यानंतर यासंदर्भात ना. मुनगंटीवार यांनी  यंत्रणेला तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले व मंत्रालयात यासंदर्भात पाठपुरावा करून या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले होते.

सोयाबीन पिकावर मुळकूज, खोडकूज, व रायझेक्टानिया एरीयल ब्लाईट या रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला.  त्याची तातडीने दखल घेत प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत तातडीने मदत देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास दिले. त्या अनुषंगाने  प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या जोखिमेच्या बाबींतर्गत जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा सरंक्षणाच्या 25 % रक्कम तातडीने देण्याबाबतची अधिसुचना निर्गमित करण्यात आली व तशा सुचना ओरीयंटल ईन्शूरंस कंपनीस देण्यात आल्या. मा. पालकमंत्र्यांनी सोयाबीन पिकाचे झालेल्या नुकसानीची कारणमीमांसा तसेच भविष्यातील व उपाययोजना आखण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञाची चमू पाचारण करून वस्तूस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याबाबत सुचित केले. त्या अनुषंगाने डॉ पंजाबराव देशमुख  कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांनी संयुक्त सर्व्हेक्षण करून शासनास अहवाल सादर केला.
जिल्हयात पावसाची सुरुवात 22 जून पासून झाली असल्याने  हंगामातील पेरण्या उशिराने म्हणजेच जूनच्या शेवटच्या आठवडयात सुरु झाल्या . जून महिन्यात सरासरीच्या 47.9 टक्के , जुलै महिन्यात सरासरीच्या 153.8 टक्के, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 52 टक्के व  सप्टेंबर 2023 महिन्यात सरासरीच्या 113.6 टक्के , अशाप्रकारे अनियमीत स्वरुपाचा पाऊस पडलेला आहे. 

जिल्ह्यामध्ये पावसाचे २ ते ३ मोठे खंड पडल्यामुळे तसेच वातावरणातील व जमिनीतील वाढलेले तापमान व त्यानंतर आलेल्या पावसामुळे प्रामुख्याने चारकोल रॉट व रायझोक्टोनिया करपा या रोगाच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले. अश्या आकस्मिक वातावरण बदलामुळे जास्त कालावधीचे, वरील रोगांना संवेदनशील वाण जसे फुले संगम व फुले किमया हे वाण जास्त प्रमाणात बळी पडले. तसेच काही भागात सुरवातीच्या अवस्थेत खोडमाशी व चक्रभुंगा या किडींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पिकाचे मुख्य खोड पोखरल्या जावून जमिनीतील अन्नद्रव्याचे वहन कमी झाले व झाडे अशक्त होवून शेंगा भरण्याच्या संवेदनशील अवस्थेमध्ये पाने पिवळी पडली, त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत शेकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणेबाबत मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे तथा कृषि मंत्री धनंजय मुंडे यांना पत्राद्वारे विनंती केली होती. त्यामूळे चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील सोयाबीन पिकाचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर पंचनामे होवून दिलासा मिळणार आहे.

Web Title: Relief to Soybean Damaged Farmers; Government orders to do panchnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.