पेरजागडावर धार्मिक स्वयंपाकावर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:03 AM2018-11-16T00:03:01+5:302018-11-16T00:07:35+5:30

तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान पेरजागड येथे महाप्रसादाचा स्वयंपाक करण्यास निर्बंध घालण्यात आल्याने भाविकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांना याठिकाणी स्वयंपाक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

Religious cooking restrictions on Perjagad | पेरजागडावर धार्मिक स्वयंपाकावर निर्बंध

पेरजागडावर धार्मिक स्वयंपाकावर निर्बंध

Next
ठळक मुद्देभाविकांमध्ये असंतोष : आता घरी अन्न शिजवून गडावर भोजन करण्यास परवानगी

घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान पेरजागड येथे महाप्रसादाचा स्वयंपाक करण्यास निर्बंध घालण्यात आल्याने भाविकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांना याठिकाणी स्वयंपाक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
गोविंदपूरजवळ पेरजागड नावाचे पहाड असून त्यावर मंदिर आहे. याठिकाणी शिवरात्री व मकर संक्रांतीच्या पर्वावर मोठी यात्रा भरते. परिसरातील २५ ते ३० गावांतील नागरिक या यात्रेत सहभाग दर्शवितात. केवळ सहभागच नाही तर पुजाअर्चा झाल्यानंतर श्रद्धेने सामुदायिक भोजनाचे आयोजनही करतात. विशेष म्हणजे, या मंदिर परिसरात वर्षभर सामुदायिक भोजनाचे आयोजन करण्याची परंपरा आहे. या भागात धानाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. धानाची रोवणी आणि कापणी झाल्यानंतर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने याठिकाणी भेट देऊन सहभोजन करतात.
मागील काही वर्षांपासून हे स्थळ परिसरातील लोकांच्या श्रद्धास्थानासोबतच पर्यटनस्थळही झाले आहे. मात्र शासनाने नुकतेच घोडाझरीला अभयारण्य म्हणून घोषित केले. हे स्थळ घोडाझरीलगत असल्याने घोडाझरी अभयारण्याच्या कक्षेत गाव समाविष्ट करण्यात आले आहे. अभयारण्याच्या नियमानुसार याठिकाणी स्वयंपाक करण्यास मनाई करण्यात आली आहे.
पर्यटक किंवा भाविकांना भोजन करावयाचे असल्यास तिथे त्यांना बाहेरून अन्न शिजवून आणावे लागणार आहे. परंतु, मंदिर परिसरात स्वयंपाक करून जेवण करता येणार नाही. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेवर बंधन घातल्याने तालुक्यातील भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.
भाविकांचे श्रद्धास्थान
नागाभीड तालुक्याच्या अगदी टोकावर असलेल्या या स्थळावर निसर्गाने मुक्तहस्ते सौंदर्याची उधळण केली आहे. शासकीय गॅझेटमध्ये पेरजागड म्हणून डोंगराची नोंद आहे. संपूर्ण डोंगर ३५ किमी अंतराचे असून डोंगराला सातबहिणीचे डोंगर या नावानेही ओळखल्या जाते. परिसरात वास्तव्याला असलेल्या गोंड, गोवारी, माना, ढिवर आदी जाती-जमातींचे नागरिक श्रद्धेने पूजा करतात. अनेक पिढ्यांपासून ही पंरपरा सुरू आहे. कृषी संस्कृतीशी संबंधित असलेला हा समाज येथे सतत दर्शनाला येतो.

Web Title: Religious cooking restrictions on Perjagad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.