पीएफमधून आता धार्मिक यात्रा
By admin | Published: June 3, 2014 11:57 PM2014-06-03T23:57:15+5:302014-06-03T23:57:15+5:30
शासकीय कर्मचारी सेवारत असताना त्यांच्या खात्यात भविष्य निर्वाह निधी जमा केला जातो. या निधीतून आता त्यांना धार्मिक यात्रा करण्यासाठी ना परतावा तत्वावर रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे.
शासनाचा निर्णय : १0 वर्षाची सेवा झालेल्यांना मिळणार लाभ
बल्लारपूर : शासकीय कर्मचारी सेवारत असताना त्यांच्या खात्यात भविष्य निर्वाह निधी जमा केला जातो. या निधीतून आता त्यांना धार्मिक यात्रा करण्यासाठी ना परतावा तत्वावर रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे. याचा लाभ १0 वर्षांची सेवा झालेल्या कर्मचार्यांना मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने हा दिलासादायक निर्णय घेतल्याने कर्मचारी संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे.
शासकीय सेवेतील कार्यरत कर्मचार्यांना नवृत्तीनंतरच्या काळात उपयोगात यावी म्हणून भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्याचे धोरण आहे. या माध्यमातून भविष्य निर्वाह रक्कम मोठय़ा प्रमाणात जमा होतो. सदर रकमेचा परतावा सेवानवृत्तीनंतर करण्यात येते. आता मात्र शासन निर्णयामुळे कुटुंबासह धार्मिक स्थळाचा प्रवास करण्यासाठी धार्मिक यात्रेचा प्रत्यक्ष खर्च अथवा जमा निधीच्या अर्धी रक्कम भविष्यनिर्वाह निधीतून काढून यात्रेचा खर्च भागविता येणार आहे.
भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणीदारांना धार्मिक यात्रेचा खर्च भागविण्यासाठी या निधीतून ना परतावा रक्कम काढण्यास राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव पी.जी. जाधव यांनी मंजुरी दिली आहे. यात्रेच्या खर्चाची रक्कम शासन सेवेतील संपूर्ण कालावधीत फक्त एकदाच सवलत मिळणार आहे. कर्मचार्यांच्या सहा महिन्यांच्या वेतनाइतकी रक्कम असल्याने किमान एकदातरी धार्मिक यात्रेचा व मनोकामना पूर्ण करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य कर्मचारी संघटनेच्या विविध संघटनांची धार्मिक यात्रा करण्याच्या अनुषंगाने ना परतावा रक्कम देण्याची मागणी प्रलंबित होती. सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांना धार्मिक यात्रेचा खर्च भागविण्यासाठी ना परतावा रक्कम काढण्याची परवानगी शासनाच्या विचाराधीन होती. राज्यात विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपल्याने कर्मचार्यांना खुश करण्यासाठी चांगला निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. (शहर प्रतिनिधी)