आवारपूर ते संगोडा रस्त्याची दुरवस्था
By admin | Published: June 30, 2017 12:52 AM2017-06-30T00:52:56+5:302017-06-30T00:52:56+5:30
सहा किमी लांबी असलेला आवारपूर ते सांगोडा या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. वणी बाजारपेठेकडे जाणार हा मार्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
आवारपूर : सहा किमी लांबी असलेला आवारपूर ते सांगोडा या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. वणी बाजारपेठेकडे जाणार हा मार्ग असल्याने दुचाकी व चारचाकी धारकांची सततची रेल चेल असते. तसेच या रस्तावरून सिमेंट कारखान्यातील मालवाहू ट्रक जात असतात. तरीही त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे.
या मार्गाचा कामगार, शेतकरी, विद्यार्थी, सोबत चंद्रपूर, वणी, यवतमाळ, घुघुस या शहरांकडे जाण्यासाठी उपयोग होत असतो. याच मार्गाने अल्ट्राटेक सिंमेट, माणिकगढ सिमेंट, अंबुजा सिमेंट या कारखान्यातील मालवाहू ट्रकची जड वाहतूक होत असते. त्यामुळे या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. दुचाकी, चारचाकीचालकांना मार्ग काढताना रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्यावरील उडालेली धूळ ट्रक मागून येणाऱ्या दुचाकीचालकांना डोळ्यात जात असल्याने समोरचे दिसेनासे होते. त्यामध्ये खड्डा चुकीवण्याचा नादात किरकोळ अपघातसुद्धा होत आहेत. पावसळ्यात रस्त्यातील खड्डे जलमय होवून रस्ता दिसेनासे होतात. याकडे लोकप्रतिनिधी व सामाजिक बांधकाम विभाग मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे.
हा जीवघेणा त्रास आवारपूर, हिरापूर, संगोडा. अंतरगाव, येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वीच हा रस्ता दुरूस्त करण्याची मागणी होत आहे. येत्या १५ दिवसांत कामास सुरुवात न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आवारपूर येथील सरपंच सिंधीताई परचाके, उपसरपंच अविनाश चौधरी व हिरापूर सरपंच प्रमोद कोडापे, सांगोड येथील राजू कोल्हे यांनी दिला आहे. हिरापूर गावालगत मोठे मोठे खड्डे पडले आहे. त्या खड्ड्यातून ट्रक चालकांनासुद्धा ट्रक बाहेर काढण्यास कसरत कारवी लागत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. रोजच या ठिकाणी किरकोळ अपघातसुद्धा होत आहे. या बाबतीत हिरापूर येथील सरपंच कोडापे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देवून दुरूस्तीची मागणी केली. परंतु त्याकडे बांधकाम विभागाने कायमची पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.