दोन हजार वर्षांपूर्वीचे अवशेष आढळले
By admin | Published: April 24, 2017 01:02 AM2017-04-24T01:02:17+5:302017-04-24T01:02:17+5:30
तालुक्यात येणाऱ्या डोंगरगाव येथील डोंगराच्या पायथ्याशी दोन हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे अवशेष सापडत आहेत.
डोंगरगाव शेतशिवार : सातवाहन काळातील अवशेष
गोंडपिपरी : तालुक्यात येणाऱ्या डोंगरगाव येथील डोंगराच्या पायथ्याशी दोन हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे अवशेष सापडत आहेत. त्यामध्ये मातीपासून तयार करण्यात आलेली भांडी, मनी, कोरीव दगड, उकर, तांब्याच्या वस्तू आदींचा समावेश आहे. डोंगरगाव परिसरात दोन हजार वर्षापूर्वी सातवाहनाचे साम्राज्य असावे, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात येणारा गोंडपिपरी तालुका सीमावर्ती भागात आहे. या तालुक्यातील शिवनी गावाजवळ वैनगंगा व वर्धा या दोन नद्यांचा संगम आहे. नांदगाव, चिवंडा येथे आठव्या ते नवव्या शतकातील मंदिराचे अवशेष विखुरलेले आहेत. कुळेनांदगाव चिवंडाप्रमाणेच आता डोंगरगावाच्या शेतशिवारात शेतात नांगरताना प्राचीन संस्कृतीचे अवशेष आढळत आहेत. गोंडपिपरी व लगतच्या पोंभुर्णा तालुक्यात प्राचीन काळातील अवशेष मोठ्या प्रमाणात आहेत.
खोदकामात मातीपासून तयार केलेले घरगुती वापरात येणाऱ्या भांड्यांचे तुकडे, दगडी हत्यार, भल्या मोठ्या दगडात उकर, मातीपासून बनविलेले आभूषण, तांब्याचे साहित्य, कोरीव दगड, मातीपासून तयार केलेल्या शिल्पाकृती यांचा समावेश आहे. सापडणाऱ्या वस्तू भद्रावती तालुक्यात येणाऱ्या चंदनखेडा येथील उत्खननात सापडलेल्या वस्तुशी साम्य असल्याने त्या सातवाहन काळातील असल्याचा अंदाज ऐतिहासीक वारसा संवर्धन समितीचे अध्यक्ष अरुण झगडकर यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, डोंगर गावापासून जवळच असलेल्या शिवनी संगमात सम्राट अशोक काळातील अवशेष सापडले आहेत. भंगाराम तळोधी येथे गोंड, भोसलेकालीन मंदिराचे अवशेष आहेत. गोंडपिपरी तालुक्याला लागूनच असलेल्या पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ देवई या गावात प्राचीन मंदिराचे अवशेष आहेत. या भागाचे उत्खनन झाल्यास हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेल्या संस्कृतीचा इतिहासावर प्रकाश पडू शकेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)