बाळशास्त्री जांभेकरांच्या सिद्धांताची आठवण ठेवावी
By admin | Published: January 9, 2016 01:19 AM2016-01-09T01:19:42+5:302016-01-09T01:19:42+5:30
पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. चांगले-वाईट जे काही घडते ते तो आपल्या लेखणीने समाजापुढे मांडतो. त्यामुळे त्याला चौफेर दृष्टी ठेवून तसे ज्ञानही ठेवावे लागते.
कीर्तिवर्धन दीक्षित यांचे प्रतिपादन : बल्लारपूर प्रेस असोसिएशनतर्फे पेपर एजंटचा सत्कार
बल्लारपूर : पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. चांगले-वाईट जे काही घडते ते तो आपल्या लेखणीने समाजापुढे मांडतो. त्यामुळे त्याला चौफेर दृष्टी ठेवून तसे ज्ञानही ठेवावे लागते. सोबतच तेवढेच सतर्क राहावे लागते. पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. हा स्तंभ क्षीण होऊ नये याची जबाबदारी पत्रकारांवरच आहे. मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारितेचे आपले सिद्धान्त आहेत. त्या सिद्धान्ताची आठवण पत्रकारांनी ठेवावी, असे विचार गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी बल्लारपुरात पत्रकारांपुढे मांडले.
पत्रकार दिनी बल्लारपूर प्रेस असोसिएशनच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मुख्य अतिथी म्हणून तहसीलदार दयानंद भोयर, मुख्याधिकारी विपीन मुदधा, पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर, बल्लारपूर पेपर मिलचे एच.आर. महाव्यवस्थापक आनंद बर्वे उपस्थित होते. मंचावर असोसिएशनचे मार्गदर्शक वसंत खेडेकर, अध्यक्ष अजय दुबे, महासचिव कुमार फुलमाळी यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी मुदधा म्हणाले पत्रकारांनी समाज परिवर्तनाचे काम केले आहे. त्यांनी सत्य तेच लिहावे. उगीच वादाला हवा देऊन बातम्यांद्वारे लोकांना भ्रमित करु नये, असे म्हणत वाचकांनी अग्रलेख वाचावे. त्यात वैचारिक मुद्दे असतात, असा आग्रह त्यांनी केला. भोयर, सिरस्कर, बर्वे यांनीही वर्तमानपत्र आणि पत्रकार यावर विचार मांडले. या कार्यक्रमात असोसिएशनद्वारे, शहरातील सर्वच पेपर एजटंचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. योगेश खेडेकर तर आभार भाउसाहेब येगीनवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)