सुतार समाजावरील अन्याय दूर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:57 AM2018-06-15T00:57:45+5:302018-06-15T00:57:45+5:30
सुतार समाजावरील अन्याय दूर करु, असे आश्वासन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सुतार समाजबांधवांना दिले. पीडित श्रीकृष्ण ओरीवकर व त्यांची पत्नी सुनिता ओरीवकर रा. हिवरखेड, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला या सुतार समाजाच्या एका गरीब दाम्पत्याला, आकोट वन विभागाचे डीएफओ गुरुप्रसाद बिहारी,.............
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सुतार समाजावरील अन्याय दूर करु, असे आश्वासन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सुतार समाजबांधवांना दिले.
पीडित श्रीकृष्ण ओरीवकर व त्यांची पत्नी सुनिता ओरीवकर रा. हिवरखेड, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला या सुतार समाजाच्या एका गरीब दाम्पत्याला, आकोट वन विभागाचे डीएफओ गुरुप्रसाद बिहारी, दोन वनपरिक्षेत्र अधिकारी के. एस. पाटील, आरएफओ वनपरिक्षेत्र अचलपूर, जिल्हा अमरावती, प्रविण पाटील आरएफओ सुमठाणा रेंज, जि. अमरावती आणि त्यांचे तीन सहकारी वनरक्षक साबळे, तायडे, ए. व्ही. राठोड यांनी अवैध लाकूड तपासणीच्या बेकायदेशिर धाडसत्राच्या नावाखाली आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करुन अमानुष मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ संबंधित वनाधिकाऱ्यांवर व कर्मचाºयांवर निलंबनाची कार्यवाही करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी सुतार समाजाने केली आहे. आमदार डॉ. संजय रायमूूलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्टÑातील सुतार समाजाच्या वतीने प्रदीप जानवे, प्रा. विजय रायमल, संजय भालेराव, विजय गवळे, श्रीकृष्ण ओरीवकर आणि इतर सुतार समाज बांधवांनी मंगळवारी मुंबई येथील मंत्रालयात जाऊन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर निवेदन दिले.
वनमंत्री मुनगंटीवार यांनी सदर प्रकरणाची माहिती जाणून घेत सुतार समाजाच्या या अतिसंवेदनशील प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आठ दिवसात सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश संबंधित वन सचिव व कक्षाधिकारी यांना दिले व आपल्या कर्तव्यदक्षपणाचा प्रत्यय दिला. ना. मुनगंटीवार एवढ्यावरच थांबले नाही तर या प्रकरणात चौकशीअंती संबंधित वन अधिकारी आणि वन कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर तातडीने निष्पक्षपणे योग्य ती कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासनही सुतार समाजबांधवांना दिले.