बदली प्रक्रियेतील त्रुटी तातडीने दूर करा
By admin | Published: April 25, 2017 12:26 AM2017-04-25T00:26:24+5:302017-04-25T00:26:24+5:30
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर सोमवारी रखरखत्या उन्हात धरणे देण्यात आले.
वेतन श्रेणी द्या : पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे धरणे
चंद्रपूर : महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर सोमवारी रखरखत्या उन्हात धरणे देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये बदली प्रक्रियेतील त्रुटी तातडीने दूर करून इतर जिल्ह्यांप्रमाणे अवघड क्षेत्र निवड तत्काळ करण्याची मागणी करण्यात आली. तसेच गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित ७५२ शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
राज्यात सर्वत्र समायोजन, विषयशिक्षक पदस्थापना व बदल्या बाबत हालचाली सुरू असताना चंद्रपूर शिक्षण विभाग मात्र शांत आहे, असा आरोप यावेळी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीचे अध्यक्ष विजय भोगेकर यांनी केला.
शिक्षक समितीने जिवती सारखा तालुक्यातील सर्व गावे अवघड क्षेत्रामध्ये घेण्याची मागणी केली. तालुक्यातील दुर्गम,अवघड असलेली गावे यादीतून वगळण्यात आली आहेत. तालुका क्षेत्र निवड समितीने शासन निर्णयातील तरतुदीनुसार गावांच्या परिस्थितीचा योग्य अभ्यास न करता अहवाल पाठवला आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय झाला आहे. विषय शिक्षकांची पदस्थापना, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना भारमुक्त करणे, विज्ञान पदविधरांना विषय शिक्षक पदस्थापनेत प्राधान्य देणे आदी विविध मागण्या समितीने निवेदनाद्वारे केल्या.
अनेक शिक्षक वारंवार निघणाऱ्या वैद्यकीय बिलातील त्रुटींसाठी व भेदभाव करून मंजूर होणाऱ्या देयकाबाबत त्रासलेले आहेत. आकस्मिक कारणासाठी काढत असलेली जी.पी.एफ. कर्ज प्रकरणे काम होईपर्यंतही मंजूर केली जात नाहीत. उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचा घोळ कायम आहे. वार्षिक बदल्या चार वर्षांपासून झाल्या नसल्याने कुटुंबापासून दूर राहत असलेले शिक्षक वैतागले आहेत, अशी टीका यावेळी करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्त्व जिल्हाध्यक्ष विजय भोगेकर, सरचिटणीस हरीश ससनकर, जिल्हा नेते नारायण आर. कांबळे, राज्य सल्लागार आर. जी. भानारकर यांनी केले. या आंदोलनात दीपक वऱ्हेकर, महिला मंच अध्यक्ष अलका ठाकरे, कार्याध्यक्ष सनिता इटनकर, सचिव शालिनी देशपांडे, किशोर आनंदवार, सायराबानो खान, मिनाक्षी बावनकर राजेश दरेकर, ओम साळवे, दिलीप इटनकर, पी. टी. राठोड, हेमंत वाग्दरकर, प्रतिभा उदापुरे, प्रभाकर भालतडक, सुनिता चल्लावार, अर्चना येरणे, पुंडलिक उरकुडे, वैशाली दीक्षित, वंदना खाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)