वनकामगारांवरील अन्याय तत्काळ दूर करावा
By admin | Published: January 15, 2017 12:49 AM2017-01-15T00:49:23+5:302017-01-15T00:49:23+5:30
वनविभागात काम करणाऱ्या रोजंदारी वनकामगारांनी कायम करण्याची मागणी करू नये म्हणून विभागाने त्यांना ९० दिवस पूर्ण होताच कामावरून कमी करण्याचा सपाटा सुरू केला आहे.
कामावरून केले कमी : कामगारविरोधी परिपत्रकाचा फटका
चंद्रपूर : वनविभागात काम करणाऱ्या रोजंदारी वनकामगारांनी कायम करण्याची मागणी करू नये म्हणून विभागाने त्यांना ९० दिवस पूर्ण होताच कामावरून कमी करण्याचा सपाटा सुरू केला आहे. हा वनकामगारांवर अन्याय असल्याचा आरोप विदर्भ वनकामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
वनविभागात रोजंदारी काम करणाऱ्या वनकामगारांची संख्या मोठी आहे. हे सर्व कामगार मजुरीने काम करतात. ९० दिवसांचे काम पूर्ण झाले की त्यांना कामावरून कमी करण्यात येते. त्यांना २४० दिवस काम करू दिले जात नाही. २४० दिवस पूर्ण झाले तर तो न्यायालयात दाद मागू शकतो. त्यामुळे त्याला कमी दिवस झाले की कामावरून कमी केले जाते.
काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात २०१२ मध्ये हे परिपत्रक काढण्यात आले होते. भाजपच्या राजवटीत हे परिपत्रक रद्द होईल, अशी आशा होती. मात्र, भाजपच्या कार्यकाळातही या कामगारविरोधी परिपत्रकाची अंमलबजावणी केली जात आहे. याबाबत वनमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. त्यांना वर्षभराचे काम उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली ंआहे. (शहर प्रतिनिधी)
कायम कामगारांएवढीच मजुरी द्या
मागील पंचवार्षिकमध्ये सत्तांतर होऊन भाजपाची सत्ता आली. भाजप सरकार तरी वनकामगारांचा विचार करेल, असे वाटले होते. मात्र तसे झाले नाही. वनविभागाने वनकामगारांशी चालविलेला हा खेळ बंद करावा. त्यांना कायम कामगाराएवढीच मजुरी देण्यात यावी, अशी मागणी विदर्भ वनकामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केली आहे.