विश्रामगृहाच्या कक्षांचे नामांतर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:32 AM2021-01-08T05:32:43+5:302021-01-08T05:32:43+5:30

पैनगंगा नदीवर बॅरेज बंधारे बांधा कोरपना : तालुक्यातील परसोडा, गांधीनगर, सांगोडा, भारोसा येथे पैनगंगा नदीवर बंधारे बांधण्यात यावे, ...

Rename the restroom rooms | विश्रामगृहाच्या कक्षांचे नामांतर करा

विश्रामगृहाच्या कक्षांचे नामांतर करा

Next

पैनगंगा नदीवर बॅरेज बंधारे बांधा

कोरपना : तालुक्यातील परसोडा, गांधीनगर, सांगोडा, भारोसा येथे पैनगंगा नदीवर बंधारे बांधण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला जलसिंचन करण्यासाठी सोयीचे होईल तसेच कोरडवाहू जमिनी ओलिताखाली येतील. या माध्यमातून सिंचनाचे क्षेत्र वाढले जाईल.

राजुरा उपविभागाचे विभाजन करा

जिवती : राजुरा उपविभागाच्या कामाचा व्याप बघता येथील उपविभागीय कार्यालयांचे विभाजन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. यात महसूल, पाणीपुरवठा, सिंचाई विभागाचा सामावेश आहे. या उपविभागात तीन तालुके आहे. त्यामुळे येथील कामाला दिरंगाई होत आहे. त्यामुळे स्वतंत्र उपविभागीय कार्यालयांची निर्मिती होणे आवश्यक आहे.

पांदण रस्त्यांचा विकास करा

सावली : तालुक्यातील अनेक गावातील पांदण रस्ते दुर्लक्षितच आहे. त्यामुळे त्यांचा विकास करून रस्ते सुलभ करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल.

रस्त्यावर हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण

चंद्रपूर : येथील गांधी चौकात किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध वस्तूंची विक्री करीत असतात. या दुकानासमोर उभे राहून अनेक नागरिक वस्तू खरेदी करतात. यामुळे वाहतूक प्रभावित होते. त्यामुळे अतिक्रमण काढावे, अशी मागणी हाेत असतानाही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

भूमी अभिलेखची रिक्त पदे भरण्याची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त आहेत. अनेक विभागातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढत आहे. याकडे लक्ष देऊन रिक्त पदे भरावे, अशी मागणी होत आहे.

सौरऊर्जा पंप बसविण्याची मागणी

नागभीड : तालुक्यातील काही गावांमध्ये असलेल्या हातपंपावर सौरऊर्जा पंप बसवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येथे हातपंपावर सौरऊर्जा बसविल्यास नागरिकांच्या सोयीचे होणार आहे. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसातही सुविधा होणार आहे.

जेनरिक औषधसाठा वाढवाण्याची मागणी

कोरपना : पंतप्रधान जनआरोग्य औषधी केंद्रामध्ये शासनाच्या सवलतीत औषधसाठा वितरित करण्यात येतो. मात्र या केंद्रात अत्यल्प प्रकारचा औषधसाठा उपलब्ध आहे. परिणामी अतिरिक्त पैसे देऊन रुग्णांना औषधांची खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे औषधसाठा वाढविण्याची मागणी आहे.

अपघातग्रस्त स्थळांवर फलक लावावे

गडचांदूर : जिल्ह्यातील अनेक अपघात प्रवण स्थळांवर फलक नसल्याने वाहनधारकांची पंचायत होत आहे. त्यांना अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अपघात टाळण्यासाठी या स्थळांवर फलक लावण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे. विशेषत: राजुरा, कोरपना तालुक्यातील रस्त्यावर फलक नसल्याने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

क्रीडांगणासाठी जागा अधिग्रहित करावी

सावली : शहराची लोकसंख्या वाढली. शाळा व महाविद्यालयामुळे विद्यार्थ्यांचे प्रमाण बरेच आहे. परंतु, क्रीडांगण नसल्याने युवक-युवतींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी शासकीय जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे जागा अधिग्रहित करून तालुका क्रीडांगण निर्माण करण्याची मागणी युवकांनी केली आहे.

महा ई-सेवा केंद्र अत्यल्प

चंद्रपूर : जिल्ह्यात महा ई-सेवा केंद्र तोकडे आहेत. परिणामी महाईसेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ७० किमीचे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. महा-ई-सेवा केंद्रामुळे लोकांना घरबसल्या दाखले मिळणार असले तरी ही सेवा इंटरनेट कनेक्टिव्हीटवर अवलंबून असल्याने नेटर्वकअभावी अनेकदा चकरा माराव्या लागतात.

बनावट बिलाचा वापर

चंद्रपूर : प्रत्येक ग्राहकाला जीएसटी क्रमांक असलेले बिल देणे गरजेचे असतानाही काही अपवादात्मक दुकानदार वगळता बहुतांश दुकानदार डुप्लीकेट बिल देऊन फसवणूक करीत आहेत. अशांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

अल्पवयीन वाहनधारकांच्या संख्येत वाढ

चंद्रपूर : शहरात मागील काही दिवसांपासून अल्पवयीन वाहनधारकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र याकडे उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलीस केवळ चारचाकी वाहनांवर अधिक कारवाई करीत असल्याचे दिसून येत आहे.

रस्त्याअभावी पेंढरी मक्तावासी त्रस्त

सावली : तालुक्यातील पेंढरी (मक्ता) येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी मार्ग नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहे. गावातील स्मशानभूमी गावापासून एक किमी अंतरावर आहे. अनेक वर्षांपासून स्मशानाकडे जाण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे पेंढरी मक्ता येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्या

चंद्रपूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून काही गावांमध्ये लाख शेतीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इतर शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण दिल्यास नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्यावे.

खर्रा पन्नीवर बंदी आणण्याची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यात खर्रा घोटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पन्नीचा वापर केला जातो. या पन्या रस्त्यावर फेकुन दिल्या जातात. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. कारवाई हाेत नसल्याने अनेक व्यावसायिक पन्नीचा सर्रास वापर करतात.

जि.प. शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करा

चंद्रपूर : कोरोनामुळे शाळा बंद आहेत. परंतु, कॉन्व्हेटमध्ये ऑनलाईन शाळा सुरु आहेत. त्यामुळे बहुतांश पालक कॉन्व्हेट संस्कृतीकडे वळत आहेत. पूर्वी जि. प. शाळांना विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे जि. प. शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरु करावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Rename the restroom rooms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.