आरटीओत वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रांचे नुतनीकरणच ‘अयोग्य’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 06:00 AM2020-01-08T06:00:00+5:302020-01-08T06:00:23+5:30
जुनी वाहने योग्यता प्रमाणपत्राशिवाय रस्त्यावरून धावू शकत नाही. हे प्रमाणपत्र कालबाह्य होत असेल तर त्याचे ठराविक मुदतीत नुतनीकरण करणे आवश्यक असते. मग यासाठी वाहन आरटीओच्या ‘फिटनेस ट्रॅक’वर न्यावे लागते. तिथे आरटीओतील अधिकारी या वाहनांच्या विविध तपासण्या करतात. या तपासणीमध्ये ते वाहन ‘फिट’ बसत असेल तरच त्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण केले जातात.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात वाहनांचे होत असलेले योग्यता प्रमाणपत्रांच्या नुतनीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नुतनीकरणासाठी वाहनाच्या हेडलाईटचे प्रकाशमान तपासणारी ‘हेडलॅम्प बीम अलायनर’ ही मशीनच तब्बल दीड वर्षांपासून निकामी असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशाची तीव्रता तपासणारे मशीनवरील मीटर तुटलेले आहे. यामुळे वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण ‘योग्य’ कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.
जुनी वाहने योग्यता प्रमाणपत्राशिवाय रस्त्यावरून धावू शकत नाही. हे प्रमाणपत्र कालबाह्य होत असेल तर त्याचे ठराविक मुदतीत नुतनीकरण करणे आवश्यक असते. मग यासाठी वाहन आरटीओच्या ‘फिटनेस ट्रॅक’वर न्यावे लागते. तिथे आरटीओतील अधिकारी या वाहनांच्या विविध तपासण्या करतात. या तपासणीमध्ये ते वाहन ‘फिट’ बसत असेल तरच त्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण केले जातात. यासाठीची यंत्रणाही आरटीओमध्ये परिपूर्ण असणे तेवढेच गरजेचे आहे. तरच वाहनांना योग्य पद्धतीने योग्यता प्रमाणपत्र देता येणे शक्य आहे. परंतु चंद्रपूर आरटीओच्या फिटनेस ट्रकवरील यंत्रणा परिपूर्ण नसतानाही वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याचा प्रकार गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. याबाबतची तक्रार राहुल तायडे यांनी आरटीओंकडे लेखी स्वरुपात केल्यामुळे ही गंभीर बाब समोर आली आहे.
चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात दररोज सुमारे १०० वाहने योग्यता प्रमाणपत्रांच्या नुतनीकरणासाठी आणली जातात. रात्रीच्यावेळी वाहनांच्या तीव्र प्रकाशझोतामुळे वाहनांचा अपघात होण्याची शक्यता असते. यावर नियंत्रण असावे, यासाठी योग्यता प्रमाणपत्र देतेवेळी वाहनाच्या प्रकाशमानाची चाचणी करूनच सदर प्रमाणपत्र देणे आरटीओला बंधनकारक आहे.
ही चाचणी ‘हेडलॅम्प बीम अलायनर मशीन’द्वारे केली जाते. मात्र चंद्रपूर येथील आरओटीच्या फिटनेस ट्रॅकवर असलेल्या ही मशीनचे मीटरच तुटलेले आहे. तरीही वाहनांना योग्यता प्रमाणपत्र दिले जात आहे.
यासोबतच वाहनाच्या ब्रेकची चाचणी कोरड्या, सपाट, कठिण रस्त्यावर घ्यावी लागते. फिटनेस ट्रॅकचे निरीक्षण केल्यास तो तीव्र उताराचा आहे. ब्रेकची चाचणी घेतेवेळी वाहनाच्या मर्यादित वेगात अचानक वाढ होते.
यामुळे अपघात घडले आहे. एचएच ३४ एम ७२१५ या वाहनाला ब्रेकच्या चाचणी दरम्यान अपघात घडल्याची गंभीर राहुल तायडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केलेली आहे. तक्रारीत अनेक धक्कादायक बाबींकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
बनावट वाहन क्रमांकाच्या आधारे योग्यता प्रमाणपत्र
वाहनांची चाचणी घेताना विशेषत: प्रवासी व स्कूल बसेस तपासणी काटेकोरपणे करण्याच्या सूचना परिवहन आयुक्तांच्या आहे. या सूचनांचे पालन होत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फिटनेस ट्रॅकवर प्रवासी बस क्रमांक एमएच २० एए ८१८१ या वाहनाला एमएच ३२ बी २४४४ या क्रमांकाच्या बनावट वाहनाच्या कागदपत्रांच्या आधारे योग्यता प्रमाणपत्र दिल्याची खळबळजनक बाब राहुल तायडे यांनी तक्रारीत नमुद केली आहे.
चेसीस क्रमांकात तफावत तरीही प्रमाणपत्र
स्कूल बस क्रमांक एमएच ३४ एबी ८२०७ या वाहनाच्या अभिलेखावरील चेसीस क्रमांक व वाहनावरील चेसीस क्रमांक यात तफावत असताना या वाहनाची नोंदणीच केली नाही. गंभीर बाब म्हणजे या वाहनाला तब्बल तीनवेळी योग्यता प्रमाणपत्र देण्यात आल्याची बाब तक्रारी अधोरेखित केलेली आहे.
पूर्वी मॅन्युअली वाहनाच्या प्रकाशाची तीव्रता तपासणी जायची. ‘हेडलॅम्प बीम अलायनर’ ही मशीन दोन वर्षांपूर्वीपासून आरटीओमध्ये सक्रिय आली आहे. या मशीनची इलेक्ट्रॉनिक सेटींग बंद पडली आहे. परंतु मॅन्युअली सेटींग सुरू आहे. मोटार वाहन निरीक्षकांना वाहनाच्या प्रकाशाची तीव्रता तपासण्याचे प्रशिक्षण दिलेले आहे. या आधारे या मशीनचा आधार घेऊन वाहनांच्या हेडलाईटची तीव्रता तपासून योग्यता प्रमाणपत्र दिले जात आहे. नवीन मशीनबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केलेला आहे.
- साजन शेंडे, मोटार वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर.