गोवरी-पोवनी डांबरी रस्त्याची माती टाकून डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:37 AM2021-06-16T04:37:13+5:302021-06-16T04:37:13+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप : पावसात चिखलाने अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी-पोवनी या मुख्य मार्गावरील ...
सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप : पावसात चिखलाने अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी
गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी-पोवनी या मुख्य मार्गावरील डांबरी रस्त्यावर मातीने डागडुजी करून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा प्रताप सार्वजनिक बांधकाम विभागाने केला. मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस पडल्याने, डांबरी रस्त्यावर चिखल झाल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
राजुरा तालुक्यातील गोवरी-पोवनी या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागत होता. रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी रामपूरच्या सरपंच वंदना गौरकर यांनी परिसरातील सरपंचाच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले होते. मात्र, उन्हाळ्यात रस्त्याची दुरुस्ती करण्याऐवजी बांधकाम विभागाने ऐन पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी गोयेगाव फाटा-गोवरी-पोवनी या डांबरी रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रताप केला. मात्र, पावसामुळे डांबरी रस्त्यावर चिखल होऊन रस्ता खराब होईल, याची पूर्वकल्पनाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्तव्यदक्ष अभियंत्यांनी केली नसावी. त्यामुळे दोन दिवसांत या रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांना चिखलाने रस्त्यावर घसरून जखमी व्हावे लागले. गोयेगाव फाटा-गोवरी-पोवनी रस्ताच चिखलमय झाल्याने वाहनधारकांना या मार्गावरून प्रवास करणे जीवघेणे वाटू लागले आहे.
कोट -
गोवरी-पोवनी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने, रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी परिसरातील सर्व सरपंचांच्या वतीने राजुरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, पावसाळा सुरू होऊनही अद्याप रस्त्याची चांगल्या प्रकारे डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे वाहनधारकांना गोवरी-पोवनी या मुख्य मार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
-वंदना गौरकर, सरपंच, रामपूर.