प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाला गालबोट
By admin | Published: January 28, 2016 12:45 AM2016-01-28T00:45:22+5:302016-01-28T00:45:22+5:30
राजुरा शहरात प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसील कार्यालय राजुराच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण सकाळी ९.१५ वाजता उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते सुरू झाले.
राजुऱ्यातील घटना : एसडीओंच्या विरोधात पोलिसांत तक्रार
राजुरा : राजुरा शहरात प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसील कार्यालय राजुराच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण सकाळी ९.१५ वाजता उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते सुरू झाले. ध्वजारोहण सुरू होताच ध्वज अर्ध्यावर जात असताना राष्ट्रीय झेंड्याला सलामी न देता झेंडा पूर्ण फडकण्यापूर्वीच राष्ट्रगीत सुरू केले. त्यामुळे राष्ट्रध्वजाचे अपमान झाल्याची तक्रार राजुरा पोलीस ठाण्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते राजू डोहे यांनी केली आहे.
प्रजासत्ताक दिन सोहळा सुरू असताना हा प्रकार घडला. याप्रसंगी राजुराचे आमदार अॅड.संजय धोटे, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, अॅड.वामनराव चटप, सुभाष धोटे, सुदर्शन निमकर, नगराध्यक्ष मंगला आत्राम, उपनगराध्यक्ष अरुण धोटे, पंचायत समिती सभापती निर्मला कुळमेथे, राजुरा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष सुनील देशपांडे, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त दत्तात्रय येगीनवार उपस्थित होते. हा घडलेला प्रकार अनेकांनी बघितला. उपविभागीय अधिकारी यांनी राजकीय मंडळी व नागरिकांशी भेट घेतल्यानंतर लोकप्रतिनिधीच्या समोर चपराश्याला सांगून उपविभागीय अधिकारी यांनी माजी लोकप्रतिनिधीच्या अगदी पुढे खुर्ची टाकून बसले. यावेळी माजी आमदार धोटे यांनी बाजूला सरकण्यास सांगितले. (शहर प्रतिनिधी)
राजुरा येथील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात अर्धवट ध्वज असताना राष्ट्रध्वजाला सलामी न देता राष्ट्रगीत सुरू केले, ही बाब अतिशय गंभीर आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी जागृत दिसले नाही. बैठक व्यवस्थेची योग्य काळजी त्यांनी घेतली नाही, ही बाब खेदजनक आहे.
- अॅड. संजय धोटे, आमदार राजुरा.
राष्ट्रीय ध्वज पूर्ण फडकण्यापूर्वीच राष्ट्रगीत सुरू करणे हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. याची चौकशी झाली पाहिजे. नगरसेवक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्यासाठी बैठक व्यवस्था नव्हती. एखाद्या योजनेचा उहापोह करणे, ही बाबसुद्धा योग्य नाही.
- सुनील देशपांडे, अध्यक्ष राजुरा शहर काँग्रेस कमेटी
राष्ट्रध्वजपूर्ण फडकल्यानंतरच राष्ट्रगीत झाले : एसडीओ
प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू असताना राष्ट्रध्वज पूर्ण फडकल्यानंतरच राष्ट्रगीत झाले. राष्ट्रगीत सुरू झाले असतानाच राष्ट्रध्वजाला सलामी दिली. आपण राष्ट्रध्वजाचा सन्मान करतो, मला फसविण्याचा प्रयत्न होत आहे.
- शंतनु गोयल, उपविभागीय अधिकारी, राजुरा.