प्रजासत्ताक दिन ठरला विद्यार्थिनींचा स्वातंत्र्य दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 01:04 AM2017-01-28T01:04:04+5:302017-01-28T01:04:04+5:30
पोंभुर्णा तालुक्यातील थेरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन विद्यार्थिंनींचा स्वातंत्र्य दिन ठरला आहे.
थेरगाव जिल्हा परिषद शाळा : अधिकाधिक संधी देऊन नेतृत्वाला वाव
चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील थेरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन विद्यार्थिंनींचा स्वातंत्र्य दिन ठरला आहे. शिक्षक किंवा मान्यवर पाहुण्यांऐवजी या शाळेने आपल्या विद्यार्थिनींना गावातील गणराज्य दिनाच्या तीन कार्यक्रमाचे संचालन करण्याची संधी दिली. आजवर या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक करायचे. मात्र पहिल्यांदा ही मोठी जबाबदारी विद्यार्थिनींनीनी समर्थपणे सांभाळली.
शाळा, ग्रामपंचायत व मच्छीमार सेवा सहकारी सोसायटी या तिन्ही ठिकाणच्या ध्वजारोहण कार्यक्रमाचे संचालन इयत्ता सातवीतील स्वाती वाघमारे हिने केले. मुख्याध्यापकांना ध्वजारोहनासाठी पाचारण करण्याचे कार्य इयत्ता सातवीची माधुरी मंडरे पार पाडले. तिने टोपी घालून कदमताल करत पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर शाळेतील मार्गदर्शन व बक्षीस वितरण कार्यक्रमाचेही संचालन स्वातीनेच केले
सदर कार्यक्रमाच्या वेळी तब्बल ४४ विद्यार्थ्यांनी भाषणासाठी नोंद केली होती. त्यातही मुलींचे प्रमाण अधिकच होते. कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षकांनी भाषण लिहून दिले होते, हे विशेष. तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे आपले विचार प्रकट केले. व सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी आजवर मिळवलेल्या यशासाठी बक्षीस वितरण परंपरेप्रमाणे गावकाऱ्यांकडून करण्यात आले. इयत्ता सातवीमधील काजल सिडांम हिला आजवर कुपोषित, अप्रगत व स्वमग्न असलेली मुलगी समजले जात होते. पण तिने स्वत: भाषण तयार करून धैर्याने सादर केले. हे तिच्या जीवनातील पहिले भाषण होते. शिक्षकांनी तिला खुप बक्षिसे दिली. (प्रतिनिधी)