प्रजासत्ताकदिनी शेतकरी चढला टॉवरवर
By Admin | Published: January 28, 2017 12:52 AM2017-01-28T00:52:40+5:302017-01-28T00:52:40+5:30
वेकोलि प्रशासनाच्या उदासिनतेमुळे खामोना येथील शेतकरी मारोती चन्ने (३०) यांनी
वेकोलि विरोधात लढा : गोवरी डीप कोळसा खाण परिसरातील घटना
गोवरी : वेकोलि प्रशासनाच्या उदासिनतेमुळे खामोना येथील शेतकरी मारोती चन्ने (३०) यांनी गुरुवारी सकाळी ९ वाजता वेकोलिच्या गोवरी डीप कोळसा खाण परिसरातील वॉयरलेस टॉवरवर चढून अभिनव आंदोलन केले.
राजुरा तालुक्यात वेकोलिच्या गोवरीतील कोळसा खाणीतून निघणाऱ्या मातीची व्यवस्थित विल्हेवाट न लावल्याने शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. वेकोलिने न्याय मिळवून द्यावा, यासाठी १५ डिसेंबरला या कोळसा खाणीच्या मुख्य प्रवेशद्वारावरच शेतकऱ्यांनी बैलबंडीसह आंदोलन केले होते. त्यावेळी वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक आर.के. मिश्रा यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर दीड महिन्याचा कालावधी उलटूनही वेकोलिने कोणताही निर्णय घेतला नाही. वेकोलिच्या गोवरीडिप कोळसा खाण परिसरातील वॉयरलेस टॉवरवर चढून आंदोलन करण्याची वेळ आली. शेतकरी टॉवरवर चढल्याचे माहिती होताच ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनात राजुरा पोलिसांचा ताफा कोळसा खाणीत धडकला. मागण्या मान्य होईपर्यंत टॉवरवरुन उतरणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता.आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. (वार्ताहर)
१४ शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत
वेकोलिच्या गोवरीडिप खुल्या कोळसा खाणीलगत मारोती चन्ने, उद्धव चन्ने, मंगला जीवतोडे, बालाजी मोरे, सत्यपाल सातपुते, महादेव सातपुते, अशोक वाघाडे, दशरथ वाघाडे, पांडूरंग बोबडे, रामचंद्र बोबडे, सदानंद वावरे, किशोर पुणेकर, प्रकाश फुटाणे, भाारती फुटाणे यांची शेती आहे. यावर्षी पावसामुळे वेकोलिचे ओव्हरबर्डन वरील माती शेतात वाहून आली. त्यामुळे शेतात गाळ साचल्याने शेतकऱ्यांना शेती करता आली नाही.