तहसीलदारांना निवेदन: युवा विद्यार्थी संघटनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2016 01:09 AM2016-07-15T01:09:04+5:302016-07-15T01:09:04+5:30
मुंबई येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिटींग प्रेसला ऐतिहासीक वारसा लाभला आहे.
आंबेडकर भवन पाडणाऱ्यांवर कारवाई करा
बल्लारपूर : मुंबई येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिटींग प्रेसला ऐतिहासीक वारसा लाभला आहे. शासनाची जबाबदारी ऐतिहासीक स्थळाचे जतन करण्याची आहे. मात्र मनमानी कारभार करुन काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन त्यावर बुलडोजर चालवून पाडण्यात आले. यामुळे आंबेडकरी समाज दुखावला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी बल्लारपूर येथील डॉ. आंबेडकर अवेकन युथ विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील तहसीलदार विकास अहीर यांना मंगळवारला दिलेल्या निवेदनातून केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर जयंती जगभर साजरी केली जात आहे. त्यांनी सामाजिक, राजकीय, धार्मिक, घटनात्मक मसुदा तयार करण्याचे कार्य दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनातून केले. समाजाची जागृती करण्यासाठी बुद्धभूषण प्रेसच्या माध्यमातून कार्य करण्यात आले. मुक समाजाला स्वाभिमानाचे धडे याच वास्तुमधून देण्यात आले. राज्य सरकार राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विश्वस्मारक उभारण्याची घोषणा करीत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या वास्तुची तोडफोड करीत आहे. या विरोधाभासामुळे आंबेडकरांना मानणाऱ्या समाजातील लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेचे तीव्र पडसाद बल्लारपूर शहरात उमटले असून विद्यार्थ्यांची संघटना पुढे सरसावली आहे. ऐतिहासीक वारसा जमीनदोस्त करणाऱ्यांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवेकन युथ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाईची मागणी केली. याचे निवेदन येथील तहसीलदार विकास अहीर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
यावेळी निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात बल्लारपूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवेकन युथ विद्यार्थी संघटनेचे निखील सुखदेवे, प्रक्षय मोडक, जया भसारकर, प्रियंका चव्हाण, सोनाली गायकवाड, बादल देशभ्रतार, अर्जुन वैरागडे, कपील ढाले, अंकीत कवाडे, प्रतीक्षा करमनकर, शिंकू ताकसांडे, अंकीता डुंबेरे, दीक्षा मालखेडे, नेहा कोल्हे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)