वाहनांचा पाठलाग करून कत्तलीसाठी नेणाऱ्या ३१ जनावरांची सुटका

By परिमल डोहणे | Published: April 10, 2023 11:07 PM2023-04-10T23:07:44+5:302023-04-10T23:08:41+5:30

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : १२ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Rescue of 31 animals being chased by vehicle and taken to slaughter | वाहनांचा पाठलाग करून कत्तलीसाठी नेणाऱ्या ३१ जनावरांची सुटका

वाहनांचा पाठलाग करून कत्तलीसाठी नेणाऱ्या ३१ जनावरांची सुटका

googlenewsNext

चंद्रपूर : अवैधरीत्या कत्तलीकरिता घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३१ जनावरांची सुटका करून १२ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई चंद्रपूर-राजुरा मार्गावरील हडस्ती येथे केली. याप्रकरणी वाहनचालकावर कलम ११ (१), (ड) प्रा. नि वा कायदा १९६०, सहकलम ५ अ (१), ५ ब, ९, ११, सहकलम ८३, १३०, १७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात अवैधरीत्या गोतस्करी होत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे पथक तयार करून त्यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, मूलवरून एका ट्रकमध्ये जनावरांना कोंबून तस्करी करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग करून व चंद्रपूरकडून राजुराकडे जाणाऱ्या रोडवर हडस्ती गावात नाकाबंदी केली. संशयित वाहन थांबवला. पोलिसांना बघताच वाहनचालकाने भांबावून धोकादायकरीत्या गाडी चालवत हडस्ती गावातील रोडवरील विद्युत पोलला धडक देत अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. पोलिसांनी एमएच ३४ बीएड ०२१० या वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये ३१ जनावरे कोंबून असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या सर्व जनावरांना राजुरा नगर परिषद कोंडवाड्यात दाखल केले. या कारवाईत ३१ जनावरांसह १२ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, पोलिस उपनिरीक्षक अतुल कावळे, पोलिस हवालदार स्वामिदास चालेकर यांच्यासह एलसीबीच्या पथकांनी केले.

Web Title: Rescue of 31 animals being chased by vehicle and taken to slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.