एसटीमध्ये दिव्यांगांना आरक्षणाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:24 AM2021-02-08T04:24:42+5:302021-02-08T04:24:42+5:30
महामंडळाच्या बसगाड्यांत अपंगांकरिता जागा निश्चित केली आहे. प्रवासादरम्यान त्यांना त्रास होऊ नये यासाठी जागा राखीव केली आहे. मात्र या ...
महामंडळाच्या बसगाड्यांत अपंगांकरिता जागा निश्चित केली आहे. प्रवासादरम्यान त्यांना त्रास होऊ नये यासाठी जागा राखीव केली आहे. मात्र या जागेवर प्रवाशांकडून जागा बळकावण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान दिव्यांगांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. सध्या बसमध्ये गर्दी होत आहे. अशात महिला व अपंगांना उभे राहूनच प्रवास करावा लागत असल्याचे चित्र बहुतांश बसमध्ये पाहायला मिळत आहे. ‘केवळ महिलांसाठी, अपंगांसाठी राखीव’ लिहिलेल्या आसनावर त्यांना बसविण्याचे सौजन्य वाहकाकडून दाखविले जात नाही. यामुळे आरक्षणाचा हेतू साध्य होताना दिसत नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये आमदार, खासदार, अपंग, महिला, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. सीटच्या मागे व खिडकीजवळ सदर जागा राखीव असल्याची सूचना लिहिलेली असते. याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वाहकांची असते, परंतु त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
बसस्थानकावर बस येताच खिडकीतून जागेवर रूमाल, बॅग अशा वस्तू टाकून जागा आरक्षित केली जाते. मात्र अपंग व्यक्तींना हे शक्य होत नाही. परिणामी, बसमध्ये चढल्यानंतर गर्दीमुळे अपंगांना उभे राहून प्रवास करावा लागतो. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. या नियमांच्या अंमलबजावणीकरिता वाहकांना सूचना देऊन प्रवाशांना सहकार्य करण्याची मागणी दिव्यांग्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.