आरक्षणामुळे उजाडलेले प्रेमनगर पुन्हा वसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:28 PM2018-12-28T22:28:22+5:302018-12-28T22:28:37+5:30
तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात बंजारा आणि आदिवासी समाजात आरक्षणावरून वाद पेटला होता. त्यावेळी जिवती तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या प्रेमनगर गावातील आदिवासी नागरिकांना या आरक्षणाचा फायदा मिळेल, म्हणून तेलंगणा राज्यातील लोकांनी प्रेमनगर येथील आदिवासी बांधवांना गाव रिकामे करा, असे म्हणत गाव पेटविण्याची धमकी दिली.
शंकर चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात बंजारा आणि आदिवासी समाजात आरक्षणावरून वाद पेटला होता. त्यावेळी जिवती तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या प्रेमनगर गावातील आदिवासी नागरिकांना या आरक्षणाचा फायदा मिळेल, म्हणून तेलंगणा राज्यातील लोकांनी प्रेमनगर येथील आदिवासी बांधवांना गाव रिकामे करा, असे म्हणत गाव पेटविण्याची धमकी दिली. त्यानंतर प्रेमनगर येथील नागरिक सात महिन्यांपूर्वी सेवादासनगर येथे रहायला आले. मात्र येथे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने पुन्हा स्थलांतरित झालेले सर्व कुटुंब प्रेमनरात वास्तव्याला गेले आहेत.
महाराष्ट्र -तेलंगणा सीमेवर गेल्या दहा वर्षांपूर्वी शेतीच्या आधारावर जगण्यासाठी सेवादासनगरवरून स्थालंतरित होऊन काही कुटुंबांनी तेलंगणातील कोलामा गावाजवळच्या शेतातच नवीन वस्ती थाटली होती. या वस्तीतील नागरिकांची नावे दोन्ही राज्यातील मतदार यादीतही नोंदविण्यात आली होती. दोन्ही राज्यातून आपला विकास होणार, अशी आशा येथील नागरिकांना होती. मात्र अचानक वर्षभरापूर्वी तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यात बंजारा आणि आदिवासी समाजात आरक्षणाचा वाद पेटला. आता प्रेमनगरातील ग्रामस्थही आपल्या आरक्षणाचा फायदा घेईल, असा समज झाल्याने कोलामा येथील आदिवासी समाजातील नागरिकांनी चक्क प्रेमनगर गावावर हल्ला चढवित गाव उठविले होते. गावात वातावरण तापत असताना वणी पोलिसांनी सतर्कतेची भूमिका घेत प्रेमनगरवासीयांचे समुपदेशन केले आणि त्या नागरिकांना सेवादासनगर येथे हलविण्यात आले होते. या घटनेला तब्बल सात महिन्यांचा कालावधी झाला. त्या कालावधीत त्यांच्या प्रेमनगर येथे असलेल्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाती आलेल्या पिकाची नासाडी झाली. हलाकीचे जीवन जगणाऱ्या नागरिकांना सोयी-सुविधा तर सोडाच जगण्याचा आधार प्रशासनाने दिला नाही. अखेर निराश झालेल्या स्थलांतरित नागरिकांनी पुन्हा प्रेमनगरातच जाऊन संसार थांटला आहे.
प्रेमनगरात आमची शेती आहे. मात्र सेवादासनगर येथे प्रशासनाने आम्हाला स्थलांतरित केल्याने सेवादासनगर येथे राहून प्रेमनगरातील शेती करणे कठीण होत होते. त्यामुळे आम्ही पुन्हा प्रेमनगरातच वस्ती थाटली आहे.
- धनराज आडे,
ग्रामस्थ, प्रेमनगर.