आरक्षणावरुन गावकरी संभ्रमात
By admin | Published: April 4, 2015 12:24 AM2015-04-04T00:24:36+5:302015-04-04T00:24:36+5:30
सदस्य आणि सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आल्यानंतर नागभीड तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
नागभीड तालुका : सरपंचपदाची सोडत
नागभीड : सदस्य आणि सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आल्यानंतर नागभीड तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. असे असले तरी काही गावात आरक्षणावरुन गोंधळ निर्माण झाल्याने गावकरीही संभ्रमात सापडले आहेत.
संभ्रमाची ही स्थिती तालुक्यातील मौशी, कोर्धा आणि भिकेश्वर या गावात निर्माण झाली आहे. या गावातील सरपंचपद हे अनु. जमातीकरिता राखीव करण्यात आले आहे. मौशी, कोर्धा येथील अनु. जमाती सर्वसाधारण तर भिकेश्वर येथील सरपंचपद याच प्रवर्गातील महिलेकरिता आरक्षीत आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, या प्रवर्गातील सदस्यांचे पद या गावात आरक्षित करण्यात आले नाही.
या गावात अनु. जमाती प्रवर्गाची लोकसंख्या काही प्रमाणात आहे. हे जरी खरे असले तरी बाकी लोकसंख्येच्या तुलनेत त्यांची संख्या कमी प्रमाणात आहे. त्यामुळेच या गावात सदस्यपदाचे आरक्षण ठेवण्यात आले नसावे, असे यासंदर्भात बोलल्या जात आहे.
ज्या गावात या प्रवर्गाची संख्या भरपूर आहे व सदस्य पदाच्या आरक्षणातही या प्रवर्गाला स्थान मिळाले आहे, अशाच गावात सरपंच पदाचे आरक्षण ठेवायला पाहिजे होते. जेणेकरुन या प्रवर्गाला खऱ्या अर्थाने प्रतिनिधीत्व करता आले असते. आता या गावात या प्रवर्गातील व्यक्ती खुल्या प्रवर्गातून निवडून आले तर ठिक, नाही तर सारेच मुसळ केरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला असून प्रशासनाने संभ्रम दूर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान सदर प्रतिनिधीने तहसीलदार श्रीराम मुंदडा यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही. (तालुका प्रतिनिधी)
ही प्रशासनाची चुक आहे. निवडणुकीच्या आधी ती दुरुस्त करण्यात यावी. जिल्हा प्रशासनानेही यात पुढाकार घ्यावा.
- संजय गजपुरे, नागभीड