कोर्टीमक्ता येथे होणार राखीव बटालियन ४ स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:44 AM2019-08-08T00:44:33+5:302019-08-08T00:45:10+5:30
राज्याचे अर्थ, वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता येथे भारत राखीव बटालियन क्रमांक ४ स्थापन करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्याचे अर्थ, वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता येथे भारत राखीव बटालियन क्रमांक ४ स्थापन करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्य शासनाला कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित कर्तव्ये वेळेवर व परिणामकारकरित्या पार पाडता यावी तसेच इतर राज्यांनाही मदत करता करण्याच्या हेतूने केंद्रीय भारत राखीव बटालियनची स्थापना करण्यात आली आहे. सदर बटालियन प्रभावपणे कार्यरत असून नक्षलविरोधी अभियानामध्ये दीर्घ आणि लघु कालावधीत गस्त, नाकाबंदी, आठवडी बाजार बंदोबस्त तसेच पोलीस ठाण्यांना संरक्षण आदी बाबी हाताळत आहे. या बटालियन व्यतिरिक्त आणखी दोन बटालियन मंजूर केल्यास नक्षलग्रस्त कारवाया तसेच कायदा व सुव्यवस्था हाताळणे सुकर होईल, या दृष्टीने राज्यासाठी दोन नविन भारत राखीव बटालियन मंजूर केल्याचे केंद्र्र शासनाने कळविले आहे. कोर्टीमक्ता येथे भारत राखीव बटालियन क्रमांक ४ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केली आहे. भारत राखीव बटालियनच्या पदांची भरती करताना नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेत प्रचलित नियमानुसार स्थानिकांना प्राधान्य देताना वय आणि शैक्षणिक अटी शिथील करण्यात येणार आहे. भारत राखीव बटालियनमध्ये गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या नक्षलप्रभावित जिल्हयामधील उमेदवारांमधूनच पदभरती होणार आहे. ही भरती प्रक्रिया दोन वर्षांत पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. नक्षलग्रस्त भागातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्याच्या प्रक्रियेत हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या निर्णयामुळे बेरोजगारांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे.
१ हजार ३८४ पदांची निर्मिती
सदर बटालियन स्थापन करण्यास मान्यता व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. गडचिरोली, चंद्र्रपूर आणि गोंदिया येथील उमेदवारांमधून होणार पदभरती सदर भारत राखीव बटालियनसाठी १ हजार ३८४ पदे निर्माण करण्यात आली. याकरिता राज्य मंत्रिमंडळाने आवर्ती व अनावर्ती खर्चाला खर्चाला मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात एकूण आवश्यक पदाच्या एक तृतीयांश पदे निर्माण केल्या जाणार आहे.
जिल्ह्यात नाविण्यपूर्ण योजना व विकासकामे
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी आणला. योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याने शेकडो कामे पूर्णत्वास आली आहेत. पायाभूत सुविधांची निर्मिती करताना राज्यात दखलपात्र ठरतील अशा नाविण्यपूर्ण योजनांकडे त्यांचे विशेष लक्ष आहे. याचाच परिणाम म्हणून संस्थात्मक कामांची संख्या वाढली. उद्दिष्टानुसार प्रशासनाकडून कामे पूर्ण करून घेत असल्यानेच हे शक्य होत आहे.