पूरबुडित क्षेत्रात रहिवास कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 11:26 PM2018-05-09T23:26:20+5:302018-05-09T23:27:06+5:30
चांगला पाऊस पडला तर चंद्रपुरातील अनेक भागांना पुराचा फटका बसतो. प्रत्येकवेळी पूरबुडित क्षेत्रातील नागरिकांना इतरत्र स्थलांतरित करावे लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चांगला पाऊस पडला तर चंद्रपुरातील अनेक भागांना पुराचा फटका बसतो. प्रत्येकवेळी पूरबुडित क्षेत्रातील नागरिकांना इतरत्र स्थलांतरित करावे लागते. नदीपात्रातच लोकांचा रहिवास असल्यामुळे त्यांना तिथून हटविण्यासाठी मनपाने अतिक्रमण करणाऱ्यांना अनेकवेळा नोटीस बजावली. मात्र या नोटीसला न जुमानता नदीपात्रात त्यांचा रहिवास कायम आहे. विशेष म्हणजे, महानगरपालिकेनेही नोटीस बजावण्यापलिकडे ठोस काहीच केले नाही. यावेळी सरासरी ओलांडून पाऊस बरसल्यास व पूरपरिस्थिती उद्भवल्यास नागरिकांचे नुकसान व महापालिकेची धावाधाव अटळ आहे.
चंद्रपूर शहरातून इरई व झरपट या दोन नद्या वाहतात. झरपट नदीचे तर डोळ्यादेखत दूरवस्था होत गेली. इरई नदी वाहती होती. चंद्रपूरकरांना पिण्याची पाणीही या नदीतून मिळते. चंद्रपूरची तहान भागविणारी नदी असतानाही या नदीकडे नागरिकांनी दुर्लक्ष करणे सुरू केले. वेकोलिचे महाकाय ढिगारे व नागरिकांच्या अतिक्रमणामुळे व कारखान्यांच्या रसायनमिश्रित पाण्यामुळे ही नदी अरुंद व दूषित झाली. परिणामी पावसाळ्यात नदीचे पाणी थोपून चंद्रपूरकरांना दरवर्षी बॅक वॉटरचा फटका बसू लागला. या पूरपरिस्थितीमुळे अनेकवेळा अतोनात नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे, रहमतनगर, सिस्टर कॉलनी, नगिनाबाग परिसरात इरई नदीच्या पूरबुडित क्षेत्रातच नागरिकांनी घरे बांधून रहिवास सुरू केला आहे. अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी राहत आहेत. काहींनी तर चक्क नदीपात्रातच अतिक्रमण करून पक्की घरे बांधली आहेत. दुसरीकडे महाकाली वॉर्ड परिसरात झरपट नदीपात्रातही लोकांनी घरे बांधली आहे. या ठिकाणीदेखील त्यांचा रहिवास अनेक वर्षांपासून आहे. दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर आला की येथील लोकांना इतरत्र स्थलांतरित करावे लागते. इरई इरई नदीला पूर आला की दोनतीन दिवस येथील पूरबुडित क्षेत्र पाण्याखाली असतो. येथील नागरिक इतरत्र आश्रयाला असतात. येथील नागरिकांनी या ठिकाणावरून स्थलांतरण करावे, यासाठी तेव्हा नगरपालिकेने जोरदार प्रयत्न केले नाही. त्यामुळे आणखी या भागात अतिक्रमण वाढत गेले. आतातर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
मागील वर्षी उन्हाळ्यातच महानगरपालिकेने झरपट व इरई नदीच्या पूरबुडित क्षेत्रातील रहिवाशांना नोटीस बजावून ही जागा सोडण्याचे निर्देश दिले होते. मात्र कित्येक वर्षांपासून येथील नागरिकांचा रहिवास असल्याने आता ते कुठे जाणार, हाही गंभीर प्रश्न आहे. आता उन्हाळ्याचा एक महिना शिल्लक आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने यंदा महापालिकेने या विषयाकडे दुर्लक्ष केले आहे.
इरई खोलीकरणाचे कामही बंद
इरई नदीचे पात्र रुंद करा, खोलीकरण करा, ही मागणी सातत्याने रेटून धरल्यानंतर प्रशासनाला जाग आली. वेकोलि, वीज केंद्र व प्रशासनाच्या सहाय्याने दोन वर्षांपूर्वी इरई नदीच्या पात्राचे खोलीकरण करण्यात येत आहे. मात्र मागील वर्षी पावसाळ्यात हे काम थांबविण्यात आले. मात्र त्यानंतर या कामाला सुरुवातच करण्यात आली नाही. सध्या हे काम अर्थवट अवस्थेत थांबले आहे. या कामासाठी निधीच नसल्याचे सांगण्यात येत आहे.
ओव्हरबर्डनमुळे पूरपरिस्थिती
चंद्रपूरलगत असलेल्या माना खाण परिसरात व इरई नदीपात्रालगत वेकोलिने मातीचे मोठमोठे ढिगारे तयार केले आहे. वर्षांनुवर्षापासून याच ठिकाणी माती टाकण्यात येत असल्यामुळे हे ओव्हरबर्डन महाकाय झाले आहे. या ओव्हरबर्डनमुळे इरई नदीचे नैसर्गिक पात्र बदलत गेले. परिणामी पावसाळ्यात चंद्रपूरकरांना नेहमीच बॅकवॉटरचा सामना करावा लागला आहे. पूर आल्यास ४० टक्के चंद्रपूरकरांना फटका बसतो.
असा आहे कायदा
जल प्रदूषण कायदा १९७४ कलम ३३ प्रमाणे कोळसा खाणीचे प्रदूषित पाणी नदीत किंवा नाल्यात सोडता येत नाही. पूर रेषेच्या आत ढिगारे ठेवता येत नाही. त्यासाठी मजबुत संरक्षक भिंत बांधावी लागते. दूषित पाणी साठविण्यासाठी तळे आणि ओव्हरबर्डनवर वृक्षारोपण करावे लागते. परंतु वेकोलिने कधीच याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे चंद्रपूर प्रदूषण व पुराचा सामना करीत राहिले.