पूरबुडित क्षेत्रातील रहिवास बेतू शकतो जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 01:00 AM2019-08-02T01:00:10+5:302019-08-02T01:00:41+5:30
मागील काही दिवसांपासून चंद्रपूरसह संपूर्ण जिल्ह्यातच संततधार पाऊस बरसत आहे. इरई धरणही ओव्हरफ्लो होण्याच्या स्थितीत आहे. चंद्रपूर शहरातून इरई आणि झरपट या दोन नद्या वाहतात. या नदीकाठावर व पूरबुडित क्षेत्रात अनेक नागरिकांचा मागील अनेक वर्षांपासून रहिवास आहे.
रवी जवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपूरसह संपूर्ण जिल्ह्यातच संततधार पाऊस बरसत आहे. इरई धरणही ओव्हरफ्लो होण्याच्या स्थितीत आहे. चंद्रपूर शहरातून इरई आणि झरपट या दोन नद्या वाहतात. या नदीकाठावर व पूरबुडित क्षेत्रात अनेक नागरिकांचा मागील अनेक वर्षांपासून रहिवास आहे. पाऊस सरासरी ओलांडून बरसला तर या नद्यांना पूर येऊन मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पूरबुडित क्षेत्रातील हा रहिवास जिवावरही बेतण्याची शक्यता निश्चितच आहे.
नदीपात्रातच लोकांचा रहिवास असल्यामुळे त्यांना तिथून हटविण्यासाठी मनपा अतिक्रमण करणाऱ्यांना दरवर्षी नोटीस बजावते. यावर्षीही त्यांना नोटीस दिली आहे. मात्र या नोटीसला न जुमानता नदीपात्रात त्यांचा रहिवास कायम आहे. विशेष म्हणजे, महानगरपालिकेनेही नोटीस बजावण्यापलिकडे ठोस काहीच केले नाही. पूरपरिस्थिती उदभवल्यास नागरिकांचे नुकसान व महापालिकेची धावाधाव अटळ आहे. चंद्रपूर शहरातून इरई व झरपट या दोन नद्या वाहतात. झरपट नदीची तर डोळ्यादेखत दूरवस्था होत असतानाही प्रशासन नदीच्या दूरवस्थेला थांबवू शकले नाही. इरई नदी वाहती आहे. चंद्रपूरकरांना पिण्याची पाणीही या नदीतून मिळते. चंद्रपूरची तहान भागविणारी नदी असतानाही या नदीकडे नागरिकांनी दुर्लक्ष करणे सुरू केले. वेकोलिचे महाकाय ढिगारे व नागरिकांच्या अतिक्रमणामुळे व कारखान्यांच्या रसायनमिश्रिम पाण्यामुळे ही नदी अरुंद व दूषित झाली. परिणामी पावसाळ्यात नदीचे पाणी थोपून चंद्रपूरकरांना दरवर्षी बॅक वॉटरचा फटका बसू लागला. या पूरपरिस्थितीमुळे अनेकवेळा अतोनात नुकसान झाले आहे. दोन वर्षांपूर्वी इरई नदीचे खोलीकरण करण्यात आले. मात्र हे काम निधीअभावी थांबविण्यात आले. इरई नदी खोलीकरणामुळे रुंद झाल्याने दोन वर्ष बॅक वॉटरचा सामना करावा लागला नाही. रहमतनगर, सिस्टर कॉलनी, नगिनाबाग परिसरात इरई नदीच्या पूरबुडित क्षेत्रातच नागरिकांनी घरे बांधून रहिवास सुरू केला आहे. अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी राहत आहेत. काहींनी तर चक्क नदीपात्रातच अतिक्रमण करून पक्की घरे बांधली आहेत. दुसरीकडे महाकाली वॉर्ड परिसरात झरपट नदीपात्रातही लोकांनी घरे बांधली आहे. या ठिकाणीदेखील त्यांचा रहिवास अनेक वर्षांपासून आहे. दोन दिवसांपूर्वी संततधार पावसामुळे या झोपड्यांच्या अगदी जवळ नदीचे पाणी आले होते. त्यानंतर पाऊस थांबल्याने त्यांचे धावाधाव टळली. त्यामुळे आता येथील नागरिकांचे पूनर्वसन करण्यासाठी प्रशासनानेच पुढाकार घेण्याची गरज आहे.
ओव्हरबर्डनमुळे पूरपरिस्थिती
चंद्रपूरलगत असलेल्या माना खाण परिसरात व इरई नदीपात्रालगत वेकोलिने मातीचे मोठमोठे ढिगारे तयार केले आहे. वर्षांनुवर्षापासून याच ठिकाणी माती टाकण्यात येत असल्यामुळे हे ओव्हरबर्डन महाकाय झाले आहे. या ओव्हरबर्डनमुळे पावसाळ्यात चंद्रपूरकरांना नेहमीच बॅकवॉटरचा सामना करावा लागला आहे. याही वर्षी जोरदार पाऊस झाला तर इरईचे पाणी थोपू शकते.