किन्ही-मुरमाडीतील ग्रामस्थांची तहसीलवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:15 AM2018-02-02T00:15:39+5:302018-02-02T00:16:10+5:30
मागील दोन महिन्यांपासून मूरमाडी, किन्ही गाव परिसरात पट्टेदार वाघाची दहशत सुरू आहे. या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, या मागणीसाठी दोन्ही गावातील शेकडो ग्रामस्थांनी गुरुवारी येथील तहसील कार्यालयावर धडक दिली.
ऑनलाईन लोकमत
सिंदेवाही : मागील दोन महिन्यांपासून मूरमाडी, किन्ही गाव परिसरात पट्टेदार वाघाची दहशत सुरू आहे. या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, या मागणीसाठी दोन्ही गावातील शेकडो ग्रामस्थांनी गुरुवारी येथील तहसील कार्यालयावर धडक दिली.
वारंवार ओरड केल्यानंतरही वनविभाग व एफ.डी.सी.एम.चे अधिकारी वाघाचा बंदोबस्त करीत नसल्याने दोन दिवसांपूर्वी मुरमाडी येथील गिता पेंदाम हिला वाघाने ठार केले. त्यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत. या संदर्भात मुरमाडी आणि किन्ही गावातील शेकडो महिलांनी आमदार विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क केला. त्यांच्याच येथील कार्यालयामधून आधी तहसील कार्यालय व नंतर वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये काँग्रेसचे अरुण कोलते, मधुकर पाटील बोरकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मूरमाडीच्या सरपंच रूपाली रत्नावार, किन्हीच्या सरपंच मेश्राम, अशोक सहारे, मोरेश्वर ज्ञानवाडकर, चंदू डोहे यांच्यासह शेकडो महिला व पुरुष सहभागी झाले होते.
मोर्चा तहसील कार्यालयात पोहचल्यानंतर तहसीलदार रावळे व नंतर वनपरिक्षेत्राधिकारी आर.एस. गोंड यांना निवेदन देण्यात आले. आठ दिवसात वाघाचा बंदोबस्त करावा. अन्यथा ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.