शाळा समायोजनाला बेलोरा ग्रामस्थांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:24 AM2017-12-20T00:24:02+5:302017-12-20T00:24:23+5:30
विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरुन तालुक्यातील बेलोरा शाळेने ३ कि. मी. अंतरावर असलेल्या जेना येथे विद्यार्थ्यांचे समायोजन करावे, असा निर्णय शासनाने घेतला.
आॅनलाईन लोकमत
भद्रावती : विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरुन तालुक्यातील बेलोरा शाळेने ३ कि. मी. अंतरावर असलेल्या जेना येथे विद्यार्थ्यांचे समायोजन करावे, असा निर्णय शासनाने घेतला. मात्र, विद्यार्थी तेथे जाण्यास तयार नाहीत. या निर्णयाबद्दल गावकऱ्यांमध्येही तीव्र नाराजी पसरली आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या नेतृत्वात मंगळवारी शिक्षकांना घेराव घालून शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. बेलोरा येथील शाळेचा आज अखेरचा दिवस होता.
० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा आदेश शासनाने नुकताच जारी केला. निकषात न बसणाऱ्यां तालुक्यातील काही शाळा बंद करून जवळच्या शाळेत समायोजन करण्याचे पत्र देण्यात आले आहे. बेलोरा येथील १ ते ४ वर्ग असलेल्या शाळेची पटसंख्या केवळ १० असल्याने ही शाळा बंद करून ३ किमी अंतरावर असलेल्या जेना येथील शाळेत समायोजन करण्याचा आदेश शासनाने दिला. मंगळवारी शाळेचा अंतिम दिवस होता. दरम्यान, विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजन केल्यास शिक्षणावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो, असा दावा करून शिक्षकांना तब्बल दोन तास घेराव केला. बेलोरा येथील शाळा पूर्ववत सुरू ठेवावी किंवा विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी व्यवस्था केली तरच शाळेत पाठवू, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह पालकांनी दिला आहे.
मुख्याध्यापक चंद्रकला गायकवाड यांना प्रशासनाने पत्र दिल्याने मंगळवारी शाळेला कुलूप ठोकले. विद्यार्थ्यांना सोबत घेऊन समायोजन झालेल्या जेना शाळेत जात असताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर कायरकर, गुणवंत मत्ते, प्रतिभा पंडोले, उमाकांत कायरकर, दर्वे आणि पालकांनी शिक्षकांना दोन तास घेराव केला. जिल्हा प्रशासनाने बेलोरा येथील विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.