ब्रम्हपुरी जिल्हा निर्मितीसाठी पंचायत समितीचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:26 AM2018-04-13T00:26:16+5:302018-04-13T00:26:16+5:30
जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्मिती करण्यासंदर्भात राज्य शासन विचार करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरी पंचायत समितीने ठराव पारित केल्याने तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्मिती करण्यासंदर्भात राज्य शासन विचार करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरी पंचायत समितीने ठराव पारित केल्याने तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
उपसभापती विलास उरकुडे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून ब्रम्हपुरी जिल्हा शासनाने घोषित करावा, असा ठराव सभागृहात मांडला या ठरावाला गटनेते रामलाल दोनाडकर यांनी अनुमोदन दिले. विशेष म्हणजे, सत्ताधारी गटाच्या नऊ सदस्यांनी पाठिंबा देऊन हा ठराव सभागृहात बहुमताने संमत केला. यासंदर्भात माहिती देताना उपसभापती उरकुडे म्हणाले, ब्रम्हपुरी हे शहर मध्यवर्ती ठिकाण आहे. लोकसंख्या, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय सोयी सुविधा, विविध विभागांची शासकीय कार्यालये उपलब्ध आहेत. जिल्ह्याचे विभाजन करताना शासनाने प्रामुख्याने ब्रम्हपुरी शहराचाच आधी विचार करावा, यासाठी हा ठराव घेण्यात आला. गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या आधीपासूनच ब्रम्हपुरी जिल्ह्याची मागणी सुरू झाली होती. परंतु याकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे , असेही त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
शासनाने जिल्ह्याचे विभाजन करताना सर्वप्रथम ब्रम्हपुरीचा विचार करावा. ब्रम्हपुरी हे ठिकाण चंद्रपूरपासून १२५ किमी लांब आहे. तालुक्यातील जनतेला शासकीय कामासंदर्भात ये-जा करताना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. ब्रम्हपुरी शहर आणि परिसराचा अद्याप विकास झाला नाही.
नवीन जिल्हा निर्मिती झाल्यास विकासाला चालना मिळेल. जिल्हास्थळाच्या दृष्टीने पायाभूत सुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे पंचायत समितीने यासंदर्भात बहुमताने ठराव पारित करण्यात आला. शासनाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या ब्रम्हपुरीला जिल्ह्याचा दर्जा प्रदान करावा, यावर उपस्थित सदस्यांनी पं. स. सभागृहात समर्थनार्थ ठाम भूमिका मांडल्याने मागणीला चळवळीचे स्वरूप येऊ शकते.
शासनाला ठराव पाठविणार
राज्य सरकारने जिल्हा निर्मितीसंदर्भात हालचाली सुरू केल्याचे वृत्त माध्यमातून पसरले आहे. परंतु, मागील अनेक वर्षांपासून ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी जनजागृती मोहीम राबविले जात आहे. या मागणीला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा असून विविध सामाजिक संघटनादेखील प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. या परिसराच्या विकास अनुशेष अद्याप पूर्ण झाला नाही. अनेक कामे रेंगाळली आहेत. जिल्हा झाल्यास विकासाला गती येईल. तसेच नागरिकांच्या समस्या दूर होतील. पंचायत समितीच्या वतीने हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.