चंद्रपूर जिल्हा विकासात राज्यात अव्वल करण्याचा संकल्प
By admin | Published: January 28, 2016 12:47 AM2016-01-28T00:47:17+5:302016-01-28T00:47:17+5:30
जिल्ह्यात विकासाच्या विविध योजनांनी वेग घेतला आहे.
सुधीर मुनगंटीवार : प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, अनेकांचा सत्कार
चंद्रपूर : जिल्ह्यात विकासाच्या विविध योजनांनी वेग घेतला आहे. त्यामुळे भविष्यात जिल्हा विकासात राज्यात अव्वल करण्याचा संकल्प पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. जिल्हावासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात ना. मुनगंटीवार यांनी विविध विकास योजनांचा आढावा घेतला. मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी परेडचे निरीक्षण केले.
मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, आ. नाना श्यामकुळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, जि.प. उपाध्यक्षा कल्पना बोरकर, सभापती देवराव भोंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने व स्वतंत्र संग्राम सैनिक तसेच अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी विविध योजनांची आणि कार्यन्वित केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. चंद्रपूर महानगरसह इतर शहरांसाठी आधी १०० कोटी रूपये निधी मंजूर केला व आता चंद्रपूर शहर १० कोटी, बल्लारपूर शहर २० कोटी, पोंभुर्णा ५ कोटी, सावली २ कोटी, ब्रह्मपुरीसाठी ५ कोटी रूपयाचा निधी मंजुर केला आहे. या निधीमधून शहरांचा सर्वांगीण विकास साधण्यात येणार आहे. बाबुपेठ उड्डाण पुलासाठी १५ कोटी रूपयाचा निधी मंजुर केला. सुधारीत प्रशासकीय मान्यता लवकरच प्राप्त होणार असून या कामास प्राधान्याने सुरुवात करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त व्यक्ती, विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी व नाट्य कलावंताचा सत्कार करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)
जिवती व पोंभुर्णा तालुक्याचा सुक्ष्म विकास आराखडा तयार
टाटा ट्रस्टकडून जिवती व पोंभुर्णा तालुक्याचा सुक्ष्म विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. या माध्यमातून नागरिकांना हवा असलेला विकास साधण्यात येणार आहे. बल्लारपूर मार्गावर बंगलोरच्या धर्तीवर निसर्ग पर्यटन विकास अंतर्गत जैव विविधता व पर्यावरणाचे संतुलन तसेच संवर्धनासाठी विसापूर येथे बॉटनिकल गार्डनची निर्मिती करण्यात येत असून यासाठी १४७ कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. या गार्डनच्या निर्मितीला वेग आला असून यामुळे स्थानिकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
बसस्थानकांचा कायापालट
बल्लारपूर-बामणी-गोंडपिपरी-आष्टी या रस्त्याला नवा राष्ट्रीय महामार्ग म्हणून केंद्रीय भुपूष्ठ परिवहन मंत्रालयाने नुकतीच तत्वता मान्यता दिली आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे नक्षलवाद कमी होण्यास मदत होणार असून औद्योगिक क्षेत्राला सुध्दा यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. चंद्रपूर आणि बल्लारपूर बसस्थानक अद्ययावत करण्यात येणार असून टप्याटप्याने सर्व बसस्थानकांचा कायापालट करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठी निधी देणार असल्याचे सांगितले.
दोन वर्षात सैनिकी शाळा
सातारा सैनिक शाळेच्या धर्तीवर चंद्रपूर येथे राज्यातील दुसरी सैनिक शाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंबंधीचा सांमजस्य करार राज्य शासनासोबत केला जाईल, असे देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आश्वासन दिले आहे. २ वर्षात सदर सैनिक शाळा सुरु करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. बल्लारपूर महामार्गावर सैनिक शाळेसाठी १२३ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येत असून ६०० विद्यार्थी क्षमता येथे राहणार आहे.