गोसेखुर्द प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 09:59 PM2018-11-11T21:59:31+5:302018-11-11T22:00:00+5:30
जलसंपदा विभागाला नदी, नाल्याचे वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावर ब्रिज कम बंधारे बांधण्यात येवून पाण्याची साठवणूक होईल. शेतीसाठी सिंचन सुविधा होणार असून शेतकरी कर्जमुक्त करण्याचे धोरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : जलसंपदा विभागाला नदी, नाल्याचे वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावर ब्रिज कम बंधारे बांधण्यात येवून पाण्याची साठवणूक होईल. शेतीसाठी सिंचन सुविधा होणार असून शेतकरी कर्जमुक्त करण्याचे धोरण आहे. गोसेखुर्द प्रकल्पामुळे दोन लाख ५० एकर शेती ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. यासाठी गोसेखुर्द प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा संकल्प रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुत्थान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी जाहीर केला.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग तथा केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात पाच हजार ४५६ कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात येणाऱ्या चौपदरी व दुपदरी रस्त्याचाा शुभारंभ त्यांच्या हस्ते रविवारी बामणी येथे करण्यात आला. यावेळी बामणी ते आष्टी ४२.२५ किमी रस्त्याचे भूमिपूजन झाल्यानंतर बामणी (दुधोली) येथील टिपार्इंट परिसरातील जाहीर सभेत ना. गडकरी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार संजय धोटे, आमदार नाना शामकुळे, आमदार किर्तीकुमार भांगडिया, आमदार देवराव होळी, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, भाजपाचे सरचिटणीस प्रमोद कडू, बामणी (दुधोली) सरपंच सुभाष ताजने, सभापती गोविंदा पोडे, रेणुका दुधे, जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, अधीक्षक अभियंता बाळासाहेब ठेंग, अभियंता विवेक मिश्रा आदींची उपस्थिती होती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, सुधीर मुनगंटीवार विकासासाठी झटणारा माणूस आहे. राजकारणात असूनही हळव्या मनाचा संवेदनशील नेता आहे. जिल्हा विकासाभिमुख करण्यात त्याची हातोटी आहे. अब्दुल कलाम निसर्ग उद्यान, सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्डन, अद्यावत साकारणारे क्रीडांगण व गावखेड्यातील रस्ते राज्य महामार्गाला जोडण्यासाठी सततचा पाठपुरावा, दिलेले वचन पाळणारा राजकारणी नसून ते सर्वसामान्यांची सेवा करणारा सेवावृत्ती जोपासणारा माणूस म्हणून त्यांनी ना. मुनगंटीवार यांचेवर कौतुकाचा वर्षाव केला.
शेतकºयांना माहिती, तंत्रज्ञानाच्या युगात सक्षम होण्यासाठी पर्यायी साधनाचा उपयोग करावा लागेल. तणस, बांबू व कोळसा यापासून बॉयो इथेनाल व सिएनजी प्रकल्प उभारण्यासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा उपयुक्त आहे. यामुळे रोजगाराचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे. वनशेती करुन बांबुपासून कोटीचे उत्पादन शेतकऱ्यांना घेता येते. विकासाची दूरदृष्टी ठेवून केंद्र व राज्य सरकार कार्यरत असून राजकारण न करता जनसेवा हेच विकासाचे ध्येय असल्याचे ना. गडकरी यांनी सांगितले.
केवळ राष्ट्रीय महामार्गच नव्हे तर विकासाचा महामार्ग -मुनगंटीवार
देशातील शेतकरी ना. नितीन गडकरी यांचा केंद्र बिंदू राहिला आहे. बामणी ते आष्टी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग करण्याची विनंती केली. त्यांनी लगेच मान्यता दिली. त्या बांधकामाचा शुभारंभ झाला. हा राष्ट्रीय महामार्गच नसून तो जिल्ह्याच्या विकासाचा महामार्ग ठरणार, असे प्रतिपादन यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. शेतकऱ्यांना उन्नत करण्यासाठी बांबुपासून इथेनाल प्रकल्प उभारण्यासाठी शेतकऱ्यांनी वनशेती करावी. कोडगल प्रकल्प गडचिरोली व चंद्रपूरसाठी वरदान ठरणार आहे. एम्सच्या धर्तीवर चंद्रपूरचे वैद्यकीय महाविद्यालय साकारण्याचा प्रयत्न आहे. आमडी व धानोरा साठी बॅरेजचे बांधकाम करण्यास आपले सहकार्य अपेक्षित आहे. जिल्ह्यात आपल्यासाठी एकलव्यांची संख्या कमी नाही, आपण द्रोणाचार्याच्या भूमिकेतून आम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंतीही ना. मुनगंटीवार यांनी ना.गडकरी यांना केली.
गडकरींमुळे दळणवळणाची सुविधा- अहीर
केंद्र सरकारात ना. नितीन गडकरी यांनी कर्तव्य बजावत तब्बल २२ हजारांवर किलोमीटरचे रुंद व चौडे रस्ते तयार करण्याचा विक्रम केला. चंद्रपूर जिल्ह्यातही तोच उपक्रम राबविला जात आहे. तेलंगणा राज्याला जोडणारे प्रशस्त मार्ग तयार होत आहेत. सिंचन क्षेत्रात भरीव कार्य केले. शेतकऱ्यांना समृद्ध व सुखी करण्याचा प्रयत्न आहे. विकासात्मक बाबी लक्षात घेवून दळणवळणाची मोठी सुविधा त्यांच्यामुळे मिळत आहे, असे केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी त्यांचा गौरव केला.
बांबुच्या वस्तूने गडकरींचा सन्मान
बांबू शिक्षण व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आहे. येथे तयार केलेली बांबुची समई, तलवार, तैलचित्र प्रदान करुन वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरिश शर्मा, काशिसिंह, मनीष पांडे आदींनी ना. नितीन गडकरी यांचा सन्मान केला. ना. गडकरी यांची भव्य रांगोळी साकारणारे शाम गेडाम, स्क्रूच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा साकारणी कलावंत अंकीता नवघरे, क्रीडा क्षेत्रात नावलौकीक वाढविणारी अंवतिका गांगरेड्डीवार यांचा मान्यवरांच्या हस्ते बांबुपासून तयार तिरंगाध्वज प्रदान करुन गौरोविण्यात आले.