संकल्प परिश्रमाचा; सिद्धी दुप्पट उत्पन्नाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:27 AM2017-09-01T00:27:39+5:302017-09-01T00:28:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नेत्यांपासून अधिकाºयांपर्यंत, जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायत पर्यंत, सरपंचापासून शेतकºयांपर्यंत आता कोणालाच कठोर परिश्रमापासून सुटका नाही. हा देश आता घोषणाबाजीवर नाही तर प्रत्येकाच्या दृढनिश्चयावर, कठोर परिश्रमावर उभा राहील. त्यामुळे शासनाकडून सिंचनाच्या सुविधा मिळतील, वीज मिळेल, जोडधंदे मिळतील, प्रशासनाकडून सुविधा आणि मार्गदर्शन मिळेल. मात्र शेतकºयांपासून तर नेत्यापर्यंत सर्वांना कठोर परिश्रम करावेच लागेल, असा संदेश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिला.
चंद्रपुरात शेकडो शेतकºयांच्या उपस्थिती गुरूवारी आयोजित ‘संकल्प से सिध्दी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर आ. नाना श्यामकुळे, आ. अॅड. संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलाचे संचालक डी.एम.मानकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हा परिषद, चंद्रपूर, डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणारे कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), स्वच्छ भारत मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संकल्प से सिध्दी’ या कार्यक्रमाचे दाताळा रोडवरील साईराम सभागृह येथे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील हजारो शेतकरी, सरपंच, पंचायत समितीचे सदस्य, सभापती, उपसभापती, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पदाधिकारी, कृषी विभागात काम करणारे सर्व अधिकारी, कर्मचारी यांची लक्षनीय उपस्थिती होती. उपस्थित सर्वांना यावेळी गृह राज्यमंत्र्यांनी शपथ दिली.
यावेळी ना. अहीर म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात देशाने अनेक क्षेत्रात क्रांती घडवली आहे. कृषी क्षेत्रात २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आगामी काळात केंद्रातून निधीची कमतरता भासणार नाही. तुमच्यापर्यंत न पोहचणारा अधिकारी प्रशासनात दिसणार नाही. तुम्हाला काय द्यावे याचा दृष्टीकोन नसणारा सरपंचापासून खासदारापर्यंत राजकारणी बनू शकणार नाही. सगळयांना खुर्ची खाली कराव्या लागतील. आज त्याचीच शपथ तुम्ही सर्वांनी घेतली असून प्रत्येकाची जबाबदारी निश्चित झाली आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक प्रेरणा धुमाळ यांनी तर संचालन काशीकर यांनी केले.
उपस्थितांनी घेतली संकल्प सिद्धीची शपथ
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापासून तर गावातल्या सामान्य शेतकºयापर्यंत या देशाचे १२५ करोड नागरिक आज स्वच्छ भारत, दारिद्र्य मुक्त, भ्रष्टाचार मुक्त, जातीयवाद मुक्त भारत, गाव विकसीत करण्याची आणि शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची शपथ घेत आहोत. त्यामुळे आज आळस झटकून जागृत होण्याचा संकल्प करतो आहे. या देशाला स्वराज्यपासून सुराज्यकडे नेण्यासाठी कटिबध्द होत आहोत, अशा आश्वासक शब्दात शेकडोच्या समुदायाने ना. अहीर यांच्या उपस्थितीत संकल्प सिध्दीची शपथ घेतली.
सरपंच मानाचे नाही तर कामाचे पद
केंद्र शासनाच्या अनेक योजना थेट ग्रामपंचायतीला मिळत आहेत. त्यामुळे सरपंच पद केवळ मानाचे नसून कामाचे सुध्दा झाले आहे. कोणत्याही नेत्याच्या मागे पुढे जायची सरपंचाला गरज नसून त्यांनी योजना समजून घेत अधिकाºयांना आदेश देण्याचे दिवस आले आहे. तुमच्या कामाचे मूल्यमापन आता करण्याचे दिवस आले आहेत. महात्मा गांधींनी भारत खेड्यात वसतो, असे सांगितले होते. पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी शेवटच्या माणसाच्या विकासासाठी अंतोदय भूमिकेची मांडणी केली होती. प्रधानमंत्री याच मार्गावर चालत असून शेतकºयांनी देखील आता आपल्या जमिनीची पत, मिळणारे पाणी, सिंचनाच्या सोयी, हवामानाचा अंदाज आणि त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ घेऊन जोमाने कामी लागले पाहिजे. उद्योग, जोडधंदे, नवे तंत्रज्ञान याबाबतची माहिती घेतली पाहिजे, असे आवाहन ना. अहीर यांनी केले.
कार्यक्रमात यांचा झाला सत्कार
कार्यक्रमा दरम्यान कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग करुन हजारो शेतकºयांना प्रेरणा देणारे यशस्वी व प्रयोगशील शेतकरी हेमंत चव्हान, घनश्याम चोपडे, राजू गरोडे आदींचा सत्कार करण्यात आला. सत्कारमुर्तींनी पहिल्या सत्रात आपल्या प्रयोगाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमामध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियाना अंतर्गत अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय आलेल्या मूल तालुक्यातील राजगड, कोरपना तालुक्यातील कुकुडसात, वरोरा तालुक्यातील आनंदवन यांना सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. तसेच कुटूंब कल्याण कार्यक्रमात योगदान देणारे ब्रम्हपूरी तालुक्यातील भूज, सामाजिक ऐकता राखण्यात वैशिष्टयपूर्ण काम करणाºया सावली तालुक्यातील मुंडाळा, पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापनात अव्वल ठरलेले चिमूर तालुक्यातील उसेगांवच्या सरपंच, सचिवांचा सन्मान करण्यात आला.