विकासात सहभागाचा संकल्प करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:54 PM2018-01-27T23:54:42+5:302018-01-27T23:55:33+5:30

जिल्हा विकासाचे विविध टप्पे अनुभवत आहे. जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर अग्रेसर करताना विकास प्रक्रियेत सर्वांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे.

Resolve to participate in the development | विकासात सहभागाचा संकल्प करा

विकासात सहभागाचा संकल्प करा

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिल्हा विकासाचे विविध टप्पे अनुभवत आहे. जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर अग्रेसर करताना विकास प्रक्रियेत सर्वांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे. प्रजासत्ताक दिनी सीमेवर लढताना प्राणांची आहूती देणाऱ्या विरांचे स्मरण करताना आपण धर्मभेद, जातीभेद न करता देशाप्रती आपले दायित्व पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचा संकल्प करताना विकास प्रक्रियेत माझाही महत्त्वपूर्ण सहभाग राहील, असा संकल्प प्रत्येक नागरिकाने करण्याचे आवाहन राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त चंद्रपूर पोलीस मुख्यालयात आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे, उपमहापौर अनिल फुलझेले, जि.प. उपाध्यक्ष कृष्णा सहारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, पोलीस अधीक्षक नियती ठाकर, मुख्य कार्यकारी अधिकार जितेंद्र पापळकर, माजी आ. जैनुद्दीन जव्हेरी, स्वातंत्र्य सैनिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
ना. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्हा विकास प्रक्रियेत राज्यात अग्रणी जिल्हा म्हणून लौकीक प्राप्त ठरण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, येथील बसस्थानकांचे आधुनिकीकरण व नुतनीकरण, चंद्रपूर शहरात अमृत पाणीपुरवठा योजना, टाटा ट्रस्टच्या सहाय्याने कॅन्सर हॉस्पीटल, जल साक्षरता केंद्र, दुग्धव्यवसाय व कुक्कुट पालनाचे प्रकल्प, चंद्रपूर व बल्लारपूर येथील हरीत रेल्वेस्थानके म्हणून विकसित करणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सैनिकी शाळा, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र, बॉटनिकल गार्डन, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ करणे, चिचडोह, चिचाळा, पळसगाव, आमडी यासारखे सिंचन प्रकल्प मंजूर झाले आहेत. ‘हॅलो चांदा’सारख्या पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेचा अभिनव प्रयोग देशात चंद्रपूरमध्येच सुरु आहे. हा जिल्हा राज्यासाठी विकासाचे मॉडेल ठरेल, याचा आपणास विश्वास आहे. ध्वजवंदनानंतर शाळांनी संचालन पथक, दंगा नियंत्रण पथक, अ‍ॅम्ब्युलन्स, सीसीटीव्ही व्हॅन, मोबाईल फॉरेंसिक लॅब, जिल्हा विकास स्वच्छता मिशन विषयीचे चित्ररथांना मानवंदना देण्यात आली. संचालन अशोक सिंह यांनी केले.
विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष
चंद्रपूर येथील न्यु. इंग्लिश हायस्कूल, सीटी हायस्कूल, जनता हायस्कूल, नेहरु विद्यालय, लोकमान्य टिळक कन्या विद्यालय, एफ.ई.एस.गर्ल्स हायस्कूल, छोटूभाई पटेल हायस्कूल, रफी अहमद किदवाई हायस्कूल, स्व. बापुरावजी वानखेडे विद्यालय, सिद्धार्थ विद्यालय, हिंदी माध्यमिक विद्यालय, मातोश्री विद्यालय, भवानजीभाई चव्हाण हायस्कूल, नुतन माध्यमिक विद्यालय, हिंदी सीटी हायस्कूल व लोकमान्य टिळक विद्यालयाच्या मुला-मुलींच्या चमूने सामूहिक कवायत, लेझीम प्रात्यक्षिके व सामूहिक बांबुड्रिल सादर केलीत. फेरिलॅड इंग्लिश स्कूल भद्रावतीच्या मुलांनी खडीमास पिटी बँड सादर केले.
पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव
राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस उपनिरीक्षक विनोद तिवारी, विशेष सेवा पदक प्राप्त सतिश सोनेकर, विशेष सेवा पदक प्राप्त विनित घागे आणि सीटीएनएस कार्यप्रणातील उत्कृष्ट काम केल्याबद्दल चंद्रकांत लांबट, पोलीस शिपाई गोपाल पिंपळशेंडे, पोलीस क्रीडा स्पर्धेतील उल्लेखनीय कामासाठी चेतन जाधव, अमृता चक्रे, मिलींद आत्राम, वैशाली पाटील, लतिका मिसार, प्रिती महाजन, दिव्या कलीये यांना पोलीस दलामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी सन्मानित केले.
कृषीभूषण व इतर पुरस्कार वितरीत
वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार चिंचाळा येथील दत्तात्रय गणपतराव गुंडावार यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते बहाल करण्यात आला. गुणवंत जिल्हा क्रीडा पुरस्कार चैताली कन्नाके, अनिल ददगाळ, सुरेश अडपेवार यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते बहाल करण्यात आला. स्वच्छ भारत मिशन वत्कृत्त्व स्पर्धेसाठी पायल पिलारे, प्रशिक मानके तर माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या विभागीय स्पर्धतील निवडीसाठी पायल वाळके, पायल मेश्राम, ललिता शिंदे, सोनुताई जाधव, निखिता मेश्राम यांचा गौरव करण्यात आला.

Web Title: Resolve to participate in the development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.