शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा, अन्यथा रस्त्यावर उतरू
By admin | Published: July 8, 2015 01:20 AM2015-07-08T01:20:32+5:302015-07-08T01:20:32+5:30
शेतपिकाला भाव नाही, उत्पादन खर्च वाढले त्यामुळे शेतकरी नैराश्याचे जीवन जगत असून त्यांना आधार देण्याची गरज आहे.
सुदर्शन निमकर यांचा इशारा : राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या सादर
राजुरा : शेतपिकाला भाव नाही, उत्पादन खर्च वाढले त्यामुळे शेतकरी नैराश्याचे जीवन जगत असून त्यांना आधार देण्याची गरज आहे. मात्र शासन केवळ पोकळ आश्वासन देऊन त्यांची बोळवण करीत असून शासनाने शेतकरी, शेतमजूर व युवक बेरोजगारांच्या समस्या लवकर मार्गी काढाव्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दिला.
राजुरा येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुक्यातील ज्वलंत समस्या संदर्भात व आगामी ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगर पालिका गटनेते शरीफभाई सिद्धीकी, नंदकिशोर वाढई, तालुका अध्यक्ष हरिदास झाडे, युवक तालुका अध्यक्ष रामभाऊ देवईकर, महिला अध्यक्ष लता ठाकरे, नगरसेविका पुष्पा कोडापे, माया रोगे, आदित्य भाके, शहर युवक अध्यक्ष नितीन बांभ्रटकर, रेणुका सावरकर, भावना ताठे, शुभांगी पिंपळकर, शारदा मोहितकर, उषा करमनकर यांची मंचावर उपस्थिती होती.
सभेमध्ये राजुरा तालुक्यातील प्रमुख समस्यांपैकी भूमी अधिग्रहण कायदा लागू करण्यात येऊ नये, निम्न पैनगंगा प्रकल्पाचा लाभ क्षेत्रातील जमिनीची खरेदी विक्रीवरील बंदी उठविण्यात यावी, खरीपामध्ये तालुक्यातील ५४ गावे समाविष्ठ करण्यात यावे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी, विहिरगाव येथे वीज वितरणच्या सबस्टेशनचे काम सुरू करण्यात यावे, पेसा कायद्यामध्ये सुधारणा करुन मच्छीमार संस्थाना तलाव तडजोडीने देण्यात यावे, बेरडी गावाचे पूर्नवसन करुन भेंडाळा सिंचन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात यावे, सेतु केंद्रातून सात-बारा उतारा देण्यात यावा, ई- फेरफर कार्यालयात सुद्धा करण्यात यावी इत्यादी समस्याबाबत चर्चा करण्यात आली.
कार्यकर्ता सभेनंतर पाचशे शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार युवक कार्यकर्त्यासह गांधी चौक, जुना बसस्टॅन्ड मार्गे समस्या सोडविण्याकरीता शासन विरोधी घोषणा देत उपविभागीय अधिकारी कार्यालयात धडकले. उपविभागीय अधिकाऱ्यांना समस्यांचे निवेदन देऊन समस्या न सोडविल्यास शेतकरी, शेतमजूर, युवक यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, असा इशारा दिला. (शहर प्रतिनिधी)