प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तात्काळ सोडवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:09 PM2018-08-13T23:09:58+5:302018-08-13T23:10:30+5:30
वेकोलिमुळे बाधित झालेल्या गावांच्या व प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजुरांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्या वेकोलिने तात्काळ सोडवून तसा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करावा, असे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी कलंत्रे यांनी वेकोलि प्रकल्पग्रस्तांची सामूहिक सभेमध्ये दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वेकोलिमुळे बाधित झालेल्या गावांच्या व प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजुरांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्या वेकोलिने तात्काळ सोडवून तसा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करावा, असे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी कलंत्रे यांनी वेकोलि प्रकल्पग्रस्तांची सामूहिक सभेमध्ये दिले.
भटाळी ओपन कॉस्ट माईन्समुळे बाधित शेतजमीन संपादित करून त्यांना आजच्या भावाने मोबदला व सोयीसुविधा द्याव्या, भटाडी खदान जडवाहनांना ताडोबा रोडावर धावणे बंद करावे, त्याच्याकरिता स्वतंत्र रस्त्याचा वापर करावा, नदीपात्राचा गैरवापर टाळावा, भटाळी गावाला लागून खदानी काम सुरू आहे त्यामुळे सदर गाव धोक्यात आहे त्याचे पुनर्वसन तात्काळ युद्धपातळीवर करण्यात यावे, पद्मापूर गावाचे भूसंपादन वेकोलिने १९९० ते ९७ दरम्यान केले होते. परंतु, येथील बाधितांना मालमत्तेचा पूर्ण मोबदला अजूनही दिला नाही. त्यामुळे वहिवाटीतील जागेचा मोबदला द्यावा, सोल्याशियम ३० टक्के देण्यात यावे, गावातील इमारतीचे मोजमाप मुल्यांकन सन १९९०-९१ मध्ये झाले व मोबदला वाटप १९९७ मध्ये केला. या मधील सहा वर्षानंतर मोबदला दिला तेव्हा त्या सहा वर्षाचे व्याज दरसाल दरशेकडा १२ टक्के प्रमाणे देण्यात यावे, सरकारी मालमत्ता रिसर्वे ७० लाख मुल्याची सोडून दिली ती देण्यात यावी, सरकारी तलाव वेकोलिने ताब्यात घेतला तो बांधून देण्यात यावा, अशा सुचना यावेळी वेकोलिला देण्यात आल्या.
दरम्यान पद्मापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेले किटाळी व मसाळा तुकूम पुनर्वसन करण्यात आले. यावर चर्चा करण्यात आली. भटाळी गावाचे पुनर्वसनची जबाबदारी येथील सरपंचानी स्वीकारली तर सिन्हाळा मसाळा (बु) नवेगाव या गावाचे पुनर्वसनाची जबाबदारी येथील सभेला उपस्थित गावकºयांनी सभेत स्वीकारली. सभेला प्रकल्पग्रस्त संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष के. जी. साव, उपाध्यक्ष कदीर शेख, सरदार काटकर यांच्यासह भटाळी, किटाळी, पद्मापूर, मसाळा, सिन्हाळा (बु), येथील नागरिक उपस्थित होते.