खासगी प्राथमिक शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:31 AM2021-03-09T04:31:02+5:302021-03-09T04:31:02+5:30
चंद्रपूर : ज्या खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांचे सरलमध्ये आधारकार्ड अपडेट झाले नाही, त्या शाळेतील शिक्षकांचे वेतन थांबविण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी ...
चंद्रपूर : ज्या खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांचे सरलमध्ये आधारकार्ड अपडेट झाले नाही, त्या शाळेतील शिक्षकांचे वेतन थांबविण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले होते. यासंदर्भात जिल्ह्यात संतापाची लाट पसरली. दरम्यान, शिक्षक आमदार नागो गाणार तसेच काही शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकाऱ्यांना यासंदर्भात जाब विचारल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी आपले आदेश मागे घेत शिक्षकांचे वेतन करण्याचे दुसरे पत्र काढले आहे. यामुळे खासगी शाळेतील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद( प्राथमिक) चे राज्य सहकार्यवाह प्रकाश चुनारकर यांनी तक्रारही केली आहे.
ज्या खासगी शाळांचे सरलमध्ये विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेटचे
१०० टक्के काम पूर्ण झालेले नसतील अशा शाळांचे फेब्रुवारी २०२१ चे वेतन अदा करू नये, असे शिक्षणाधिकारी यांनी वेतन अधीक्षक (प्राथमिक) व भविष्य निर्वाह निधी पथक चंद्रपूर यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते.
यावर चंद्रपूर जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शिक्षकांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद( प्राथमिक) राज्य सहकार्यवाह प्रकाश चुनारकर यांनी शिक्षण उपसंचालक नागपूर, तसेच शिक्षक आमदार नागो गाणार यांच्याकडे तक्रार करून वेतन तत्काळ अदा करण्याची मागणी केली होती. शिक्षक आमदार नागो गाणार यांनी वेतनाच्या प्रश्नासंबंधी दखल घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रश्न निकाली काढल्याने शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.