सैनिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी मुलींचा उदंड प्रतिसाद; 10 जागांसाठी 820 अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 02:13 PM2019-12-25T14:13:06+5:302019-12-25T14:13:13+5:30
मुलींना प्रवेश देणारी ही देशातील पहिली सैनिक स्कूल ठरणार आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर सैनिक स्कूलमध्ये शैक्षणिक सत्र २०२०-२१ पासून मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. मुलींना प्रवेश देणारी ही देशातील पहिली सैनिक स्कूल ठरणार आहे. या पहिल्या शैक्षणिक सत्रात इयत्ता सहावीमध्ये १० मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. २०२०-२१ या वर्षाच्या शैक्षणिक सत्राची प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये मुलांमधून इयत्ता ६ वीसाठी १८१०, तर इयत्ता ९ वीसाठी १२९५ मुलांचे अर्ज प्राप्त झाले. उल्लेखनीय, यावर्षीपासून इयत्ता ६ वासाठी १० मुलींना प्रवेश दिला जाणार असून यासाठी अल्पावधीत तब्बल ८२० अर्ज प्राप्त झाले आहेत. हा मुलींचा हा उदंड प्रतिसाद पाहून सैनिक शाळा प्रशासनाने आश्चर्य व्यक्त केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात चंद्रपूरपासून बल्लारपूर मार्गावर विसापूर ग्रामपंचायत हद्दीत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या सरकारात राज्याचे अर्थ व नियोजन, वनेमंत्री असताना चंद्रपूर जिल्ह्यात सैनिक शाळा सुरू करणे हा त्यांचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ होता. या सैनिक शाळेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील तरुणांना देशाची सेवा करण्याची संधी मिळावी, हा यामागचा मुख्य हेतू. अवघ्या वर्षभरात अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा इमारतीची उभारणी करून ही शाळा नवीन इमारतीत प्रत्यक्षात सुरू करण्यात आली.
२०१९-२० या सत्रापासून या सैनिक शाळेत मुलांना प्रवेश दिला गेला. सैनिक शाळेची वास्तू डोळ्यात साठवून ठेवावी, अशी आहे. देशातील इतर सैनिक शाळांच्या तुलनेत ही शाळा इमारत सर्वसोईंनी युक्त अशी आहे. पहिल्याच वर्षी प्रवेशाठी मुलांच्या पालकांनी एकच गर्दी केली होती. हा प्रतिसाद पाहून मंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांनी या सैनिक शाळेत मुलींनाही भारतीय सैन्य दलात मोठ्या हुद्द्यावर राहून देशाची सेवा करता यावी, या अनुषंगाने या शाळेत मुलींनाही २०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासून प्रवेश दिला जावा, यासाठी पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यशही आले. नोव्हेंबर महिन्यात इयत्ता ६ वी मध्ये १० मुलींना प्रवेश देण्याची परवानगी सैनिक शाळा व्यवस्थापनाला प्राप्त झाली.
सैनिक शाळेचे स्कॉड्रन लीडर प्राचार्य नरेशकुमार यांनी शैक्षणिक सत्र २०२०-२१ साठी प्रवेश प्रक्रिया ‘ऑनलाईन’ पद्धतीने सुरू केली. ६ डिसेंबर ही या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. या अल्पावधित या प्रवेश प्रक्रियेला पालकांकडून उदंड प्रतिसाद दिला. अखेरच्या दिवसापर्यंत मुलींच्या केवळ १० जागांसाठी तब्बल ८२० प्राप्त झाल्याचे पाहून सैनिक शाळा व्यवस्थापकानेही आश्चर्य व्यक्त केले आहे. तर मुलांच्या प्रवेशासाठी इयत्ता ६ वीसाठी तब्बल १८१० अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये इयत्ता ९ वीसाठीच्या १२९५ अर्जांचा समावेश आहे. मुलींसाठीच्या ८२० अर्जांतून केवळ १० मुलींना प्रवेश देण्याची कसरत आता शाळा व्यवस्थापनाला करावी लागणार आहे. गेल्यावर्षीपासून सुरू झालेल्या महाराष्ट्रातील या दुसºया सैनिक शाळेकडे विद्यार्थ्यांचा वर्षागणिक कल वाढता आहे.
मुलींना वस्ततिगृहासाठी शासनाकडे प्रस्ताव
सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासून मुलींनाही चंद्रपूर येथील सैनिक शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर अत्याधुनिक सुविधेसह उभारलेल्या सैनिक शाळेत मुलींसाठी वसतिगृहाची सोय व्हायची आहे. या अनुषंगाने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळतील, अशी आशा आहे, अशी माहिती सैनिक शाळेचे स्कॉड्रन लीडर प्राचार्य नरेशकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडूनही पाठपुरावा सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सैनिक शाळा व्हावी हे माझं स्वप्न होतं. त्या स्वप्नाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू आहे. देशामध्ये पहिल्यांदा मुलींना सैनिक शाळेमध्ये प्रवेश देण्याचा सन्मान हा चंद्रपूरचे आराध्य दैवत शक्तीदायिनी, तेजस्विनी माता महाकालीच्या भूमीला मिळाला याचा आनंद आहे. मी माझ्या कार्यकाळात सुरू केलेले प्रत्येक काम हे अंतिम टप्प्यावर निश्चितपणे नेणार आहे. आजपर्यंत मी जे जे ठरवलं, जो निर्धार केला तो पूर्ण केला आहे. यापुढेही सुरू असलेली सर्व कामे मी पूर्णत्वास नेणार आहे.
- सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थ व नियोजन, वने मंत्री, म.रा. व आमदार बल्लारपूर मतदार संघ जि. चंद्रपूर.
सैनिक स्कूलमध्ये पुढील सत्रापासून पहिल्यांदाच इयत्ता ६ वीपासून प्रवेश दिला जाणार आहे. यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन होती. यामध्ये पहिल्या सत्रात १० मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. या दहा जागांसाठी विविध भागातून तब्बल ८२० अर्ज प्राप्त झाले आहेत. हा उदंड प्रतिसाद पाहून मुलीही आता भारतीय सैन्यदलात मोठ्या हुद्द्यावर दिसतील. ही गौरवाची बाब असेल. या शाळेत मुलांसोबत आता मुलीही मुले एकत्र येणार असल्यामुळे एकमेकांना सहकार्य, मदत, सन्मान करण्याची भावना वाढीस लागेल.
- नरेश कुमार, स्कॉड्रन लीडर प्राचार्य, सैनिक स्कूल, चंद्रपूर.